कळेल का कधी तुला…..

by | Apr 8, 2024

प्रेमाच्या कितीतरी छटा असतात. काळ बदलतो तशी त्याची संकल्पना थोडी बदलते पण भावना आणि तिची उत्कटता तीच राहते . प्रेम ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही वयात भुरळ घालते, आवडते आणि आपलेसे सुद्धा करते. प्रत्येक कथेची एक कथा असते. जशी सायली आणि प्रतीक. ही कथा तशी फार नवीन नाही आणि फार जुनीही नाही. लँड लाईन होती पण मोबाईल नव्हते, तेव्हाची आहे. 

प्रतीक आणि सायली दोघे एकाच शाळेत पहिल्यापासून आणि शेवटची दोन तीन वर्षे तर एकाच वर्गात. खूप दाट मैत्री नव्हती, सुरवातीला कधीतरी गप्पाटप्पा व्हायच्या नाहीतर अभ्यासाचे बोलणे व्हायचे. सायली नांवाप्रमाणेच नाजूक, गोरीपान, सुंदर मुलायम केस आणि दोन्हीं गालांवर खाल्या. स्वभावाने खूप सरळ, लाघवी अन खूप मोकळी ढाकळी. प्रतीक वर्गात सर्वात उंच, व्यायामाची आवड असल्यामुळे पिळदार शरीयष्टी, रंगाने तोही गोरापान, काळेभोर केस आणि प्रसन्न व्यक्तिमत्व, तसा शांत आणि लाजाळू. बोलायचा पण तोलून मापून. त्याची मैत्री तशी कमी जणांशी पण केली की अगदी जीवाभावाची. ह्या उलट सायली. तिला पुष्कळ मैत्रिणी. सर्वांशी बोलायला तिला आवडायचे आणि सर्वाना ती आवडायची. जे असेल ते स्पष्ट बोलायचे, उगीच छक्केपंजे नाहीत. कधीही मदत लागली तर ती तयार. प्रतीक तसा बुजरा होता हे तिला माहित होते. त्यामुळे सर्वजण एकत्र असताना कोणी त्याची मस्करी केली तर ती लगेच सावरून घ्यायची. त्याला तिचा हा गुण आवडायचा आणि तीही आवडायची एक चांगली मैत्रीण म्हणून. ह्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात कधी रूपांतर झाले त्यालाच कळले नाही, किंवा असे म्हणूया मुळात आपले तिच्यावर प्रेम आहे हेच त्याला कळले नाही. तो आपला तिला एक चांगली मैत्रीण म्हणूनच मानत होता आणि ते होतेही खरे.

मनोमन खूप आवडायची ती त्याला. कधीतरी मित्र मस्करी करायचे वर वर पण तो काही थांग लागू द्यायचा नाही. भलतीसलती मस्करी त्याला आवडायची नाही हे त्यांना माहित होते त्यामुळे कोणी जास्त खोलात विचारण्याची हिम्मतही करत नसे. काहीही बोलण्याचा अधिकार फक्त एकाला होता आणि तो म्हणजे ओंकार. तो प्रतीकला त्याच्यापेक्षा जास्त चांगले ओळखायचा. असेच शेवटचे वर्ष सुरु झाले आणि हळूहळू अभ्यासाला जोर येऊ लागला. 

एकदा वर्गात शिक्षकांनी प्रयोग करायचे ठरविले. त्यांनी सांगितले की ह्यावेळी वर्गातल्या छोट्या टेस्टचे पेपर्स ते तपासणार नाहीत, तर पेपर आपसात अदलाबदली केले जातील आणि मुलांनीच एकमेकांचे पेपर तपासायचे म्हणजे कळेल की काय अपेक्षित असते आणि काय चुका होतात. कोणालाही कोणताही पेपर मिळेल आणि तपासणाऱ्याने स्वतःकडे नोंद करायची कोणाचा पेपर तपासाला ह्याची पण पेपर वर नाव नाही लिहायचे कि सही नाही करायची. सर्वजण खूष झाले ह्या नव्या प्रयोगावर. 

सायलीला मिळाला नेमका शत्रूचा पेपर, एवढ्या खोड्या काढायचा तो मुलगा सगळ्यांच्या की सायलीने ठरविले चांगलाच धडा शिकवायचा ह्याला. मग काय, एवढा कडक तपासण्यात आला पेपर की एकेक काना, मात्रा सर्व काही तपशीलवार तपासण्यात आले आणि मार्क्स कापण्यात आले. चांगलाच धडा शिकवला आपण ह्या आनंदात मज्जा म्हणजे मॅडम ना पत्ताच नव्हता स्वतःचा पेपर कोणाकडे गेला होता ते. तो पेपर गेला नेमका प्रतीककडे मग काय त्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही. काही चुका नजरअंदाज करण्यात आल्या कारण मार्क्स कापायला जीवावर आले तर व्याकरणाला कोणी मार्क्स कापते का म्हणत तेही माफ करण्यात आले. उत्तरे तर सागळी बरोबरच आहेत थोडेफार इकडे तिकडे चालतेच आणि सुंदर हस्ताक्षराचे अजून २ ज्यादा मार्क्स. बरसात होती नुसती मार्क्सची. नशीब हा फक्त एक प्रयॊग होता. सायलीला जेव्हा तपासलेला पेपर मिळाला तेव्हा ती एवढी खूष झाली. घरी जाताना प्रतीक भेटलाच नेहमी प्रमाणे, त्याने आपले उगीच विचारले, “किती मिळाले ग तूला?” सायलीने ने अभिमानाने पेपर दाखवला आणि सांगितले, “बघ, सुंदर हस्ताक्षराचे पण मार्क्स मिळाले मला.” प्रतीक मनोमन स्वतःवरच खूष झाला. सायलीला आनंदात पाहून, त्यालाही खूप आनंद होत होता पण कळत नव्हते की तो का एवढा खुश होत होता. त्याला स्वतःलाच शाबासकी द्यावीशी वाटत होती, त्याला अजून काय पाहिजे होते, पण दोन क्षण देखील झाले नसतील आणि तिने त्याचे स्वप्न भंग केले. “तुला माहित आहे प्रतीक, कोणी तपासाला असेल माझा पेपर?” प्रतीक गडबडला, त्याचे पितळ उघडे पडले होते.

त्याने आपले उडवाउडवीचे उत्तर दिले, “छे ग, मला काय माहित? तपासणाऱ्याने आपले नाव लिहायचे नाही असे ठरले होते ना.” सायलीने थोडा वेळ एकटक बघितले पण नंतर तिला पटले ते आणि ती म्हणाली, “जाऊ दे, जो कोणी असेल चांगला आहे बिचारा.” हे ऐकून प्रतीकला मनोमन गुदगुल्या झाल्या पण, पुढच्याच क्षणी सायली ने त्याच्या आनंदाच्या चिंधड्या उडवल्या. “अरे ढढोबा आहे वाटते कोणीतरी. किती चूका माझ्या त्याला कळल्याच नाहीत.” प्रतीक ने मनातच डोक्याला हात मारून घेतला. एवढी माझी मेहनत आणि ही मलाच ढढोबा म्हणते. “जाऊदे ना, सोड तो विषय,” असे म्हणून त्यानेच विषय बदलला. संध्याकाळी जेव्हा त्याला ओंकार भेटला तेव्हा त्याने सगळा प्रसंग सांगितला आणि सायलीला कशी खूष होती ते भरभरून बोलत होता. ओंकारला हसू आले. प्रतिकने विचारले, ” काय मला ढढोबा म्हणाली म्हणून हसायला येते आहे का फार? तू माझा मित्र आहेस की शत्रू?” ओंकार हसत म्हणाला, “ढढोबा तर तू आहेसच. काय म्हणून तिला असे मार्क्स वाटलेस? का नाही चुका दाखवल्यास?” प्रतीकला उत्तर सुचेना आणि काय सांगावे ते कळेना. खरेच का बरे असे केले मी? तो आपला विचार करत राहिला आणि ओंकारने एक टपली मारत त्याला सांगितले, “तुला आवडते ती.” ह्यावर, “हो मैत्रीण आहे ना ती माझी, आवडतेच मला, त्यात काय?” असे प्रतिकने उत्तर दिले. “मग अजूनही आहेत तुझ्या मैत्रिणी त्यापण अशाच आवडतात? असाच खूष होतोस त्यांच्यासाठी? आम्हीपण आहोत तुझे मित्र आमच्यासाठी नाही एवढा खूष होत ते? कळते आहे का काही मिस्टर ढढोबा? तुम्हाला खास आवडते ती. आपले प्रेम आहे तिच्यावर सरकार.” 

प्रतीकला काही हे पटले नाही, ” काहीपण फालतू बोलू नकोस. काहीही अर्थ काढतोस आपला तू.” असे प्रतिकने त्याला जेव्हा जरा रागानेच सांगितले तेव्हा ओंकार म्हणाला, “ठीक आहे मग. एक प्रयोग करूया. उद्यापासून तू आठ दिवस तिच्याशी बोलायचे नाहीस, चालेल?” ” त्यात काय आहे एवढे? चालेल.” असे प्रतीक म्हणाला आणि ओंकार ने त्याला चॅलेंज केले, “जर हरलास तर मला २ वडापाव द्यावे लागतील चालेल?” “दिले,” असे म्हणत प्रतिकने त्याचा चॅलेंज स्वीकारला आणि ते दोघे निघाले. त्याने मान्य तर केले खरे पण त्यालाच कळत नव्हते कि त्याला कसेतरी, उगाच अस्वस्थ झाल्यासारखे, काहीतरी फार मोठे नुकसान होणार असल्या सारखे का वाटत होते. मग स्वतःशीच लगेच तो म्हणाला, ” हे पण हा फालतूपणा उगीच कशाला करायचा? तिला काय वाटेल? उगीच गैरसमज व्हायचा ना?” हे ऐकून लगेच ओंकार ने त्याला पकडलेच “साल्या! मागे मी तुला आठ दिवस भेटलो नव्हतो तेव्हा तुला काही फरक पडला नाही. तेव्हा नाही वाटले तुला माझा गैरसमज होईल ते आणि आता भारी काळजी तूला तिची? कळतेय का काही राव ह्यालाच प्रेम म्हणतात.” प्रतिकने त्याला काही ना बोलता एक धपाटा घातला आणि हातानेच बाय करून तो निघाला. निघाला खरा पण ओंकार ने एक पिल्लू सोडले त्याच्या डोक्यात.. त्याला कळत नव्हते नक्की काय म्हणतात ह्याला? प्रेम? छे छे! प्रेम म्हणजे कसेसेच असते नाही? असे असते प्रेम? खरेच का नाही जमणार मला आठ दिवस ना बोलायला? आपले कुठे प्रेमबिम आहे? ओंकार ना काहीही बोलतो तोंडाला येळ ते. आरामात जमेल आपल्याला अन करून दाखविनच त्याला असा त्याने निश्चय केला आणि तो मनोमन आनंदाला कि आपले प्रेमबिम काही नाही तर शुद्ध मैत्री आहे. 

दुसऱ्या दिवशी सायली दुरूनच दिसली आणि त्याने मार्ग बदलला खरा पण उगीचच त्याला हुरहूर वाटली. का ते कळले नाही. वर्गातही, त्याने तिच्याकडे बघण्याचे टाळले आणि मित्रांबरोबर बिझी असल्यासारखे दाखवले. घरी जातानाही तिला मैत्रिणींच्या घोळक्यात पाहून त्याने काढता पाय घेतला खरा पण संपूर्ण दिवस त्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. धड कुठे लक्ष लागत नव्हते. ओंकार भेटला तेव्हा त्याने विचारलेच, “अरे लक्ष कुठे आहे तुझे? भेटली का सायली आज? काय झाले?” जरा चिडचिडतच “काय होणार? नाही बोललो मी तिच्याशी, त्यात काय? सोप्पे आहे.” त्याच्या बोलण्याचा आणि चेहऱ्यावरच्या भावनांचा ताळमेळ बसत नव्हता हे ओंकारला कळत होते पण तो काही बोलला नाही. “चांगले आहे मग,” असे म्हणून त्याने विषय बदलला. दुसरा आणि तिसरा दिवसही कसाबसा गेला पण हे सगळे त्याला जीवघेणे वाटत होते, का ते कळत नव्हते पण सहन होत नव्हते. ओंकार भेटला तेव्हा त्याचे अजिबात लक्ष नव्हते त्याच्या बोलण्याकडे. “अरे मी काय म्हणतोय? लक्ष कुठे आहे तुझे?” ओंकारने नुसता सहज प्रश्न केला आणि नेहमी शांत, संयमी असणारा प्रतीक, “ऐकतोय ना तुझे, अजून काय पाहिजे तुला? सारखे तुझेच ऐकू का?” म्हणून चिडचिडला. ओंकारला कळले काय होते आहे ते, मग काय त्याला अजून चेव आला, “बरं ठीक आहे. रागावू नकोस. नको ऐकूस माझे. सायली काय म्हणते ते सांग. बऱ्याच दिवसात काही ऐकले नाही तुझ्याकडून?” आता मात्र प्रतीकचा बांध फुटला, “काय म्हणणार ती? मला काय माहित? मला का विचारतोस? तू तर बोलत होतास ना तिच्याशी? साल्या मला चॅलेंज दिलायंस आणि स्वतः गप्पा मारतोस तिच्याशी. फालतूपणा नुसता. तीन दिवस बोललो नाही मी तिच्याशी. आज हाक मारत होती तरी ऐकू नाही आली असे दाखवून निघून आलो. काय माहित आता बोलेल कि नाही माझ्याशी? फालतू साला, मला नको आहे तुझी पैज. मोडतो आज मी.” असे म्हणत त्याने ओंकारवर घसरा केला. ओंकार हसू लागला आणि म्हणाला, ” मी कुठे बेट लावली तुझ्याशी? मी असेच बोललो होतो. पण काय हालत झाली यार. तीन दिवसात. एवढी चिडचिड? कळते आहे का काही? झोप नाही ना आली? भीती वाटली ना तिला गमावण्याची? समोर आली की कावरेबावरे व्हायला होते तुला. प्रेम ह्यालाच म्हणतात. हेच समजावयाचे होते. नकार घंटा लावली होतीस ना?” प्रतीकला एक्दम उपरती झाल्यासारखा तो गप्प बसला आणि हळूच त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य उमटले. तो लपवायला गेला पण ओंकारने पकडलेच त्याला, “अहाहा! काय गुदगुल्या होतायत मनातल्या मनात. हरामखोर! सांगत होतो तर पटत नाही. तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो मी तुला, कळले? जा तुला माफ केले. आता तू तिच्याशी बोलायला मोकळा उद्या. हमने तुम्हे माफ़ किया.” असे म्हणून त्याने प्रतीकच्या पाठीवर एक थाप मारली आणि प्रतिकने त्याला सलाम केला. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि सायलीशी बोलतो असे झाले होते त्याला, पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न. नेमकी सायली आलीच नाही आणि प्रतीकच्या जीवाची घालमेल सुरु झाली. आधीच तीन दिवस फुकट गेले होते आणि आज काय झाले हिला? तेवढ्यात प्रिया दिसल्यावर अगदी सहजपणे विचारल्यासारखे करत प्रतीक म्हणाला, ” काय प्रिया, काय म्हणतेस? आज तुझी मैत्रीण नाही दिसत कुठे ती? सायली शिवाय आज तू? ” प्रिया गडबडीतच होती. तिने आपले, जुजबी उत्तर दिले, “अरे आज प्रोजेक्ट सबमिशन आहें ना? अजून थोडे काम बाकी आहे रे आणि सायली ला ना? ताप आला हे जरा तिला. वाटत नाही ती दोन तीन दिवस येईल.” शेवटचे वाक्य त्याला हादरवून गेले. अजून दोन तीन दिवस? च्यायला ह्या ओंकारशी पैज मा मारायलाच नको होती. जबरदस्ती आठ दिवस पूर्ण होणार वाटते. तेवढ्यात ओंकार आलाच, “अरे तुझ्या सायलीला बरे नाही ऐकले.” ‘तुझी सायली’ हे शब्द मनोमन त्याला सुखावून गेले पण तिला बरे नाही हे ऐकून मात्र त्याला वाईट वाटले. पण काही पर्याय नव्हता वाट बघण्याखेरीज. कसेबसे तीन दिवस झाले आणि सायली आली. खूप अशक्त दिसत होती. “काय ग काय झाले तूला?” प्रतिकने बघताक्षणी विचारले. “काही नाही रे, थोडा ताप आला होता, आता बरे आहे. पण अभ्यास बुडाला रे. आता सगळे कॉपी करायला खूप वेळ लागेल.” ती क्षीण आवाजात बोलत होती आणि बोलतानाही तिला दम लागत होता. प्रतीक म्हणाला, “तू काळजी नको करुस. माझ्या नोट्स कंप्लिट आहेत, मी देईन तुला आणि लिहायला पण मदत कारेन.” सायलीला खूप आधार वाटलं. अभ्यास बुडलेला तिला आवडत नसे. शाळा सुटल्यावर दोन दिवस प्रतिकने तिला नोट्स कंप्लिट करायला मदत केली आणि छान समजावूनही सांगितले. शाळेचा टॉपर होता तो. खूप छान समजावून सांगायचा आणि शिकवायचा. सायलीला आता जरा बरे वाटत होते आणि त्याच्या मदतीने तिला खूप छान वाटले कि तिचा बुडलेला अभ्यास पूर्ण झाला. तिने त्याचे आभार मानले खूप मनापासून अन तो म्हणाला, “दोस्ती का एक उसूल है मॅडम, नो सॉरी, नो थँक यु.” त्यावर मनसोक्त हसत आणि त्याला फिल्मी म्हणत ती निघून गेली. तिला हसताना बघायला प्रतीकला खूप आवडायचे. तिच्या दोन्ही गालावर सुंदर खळ्या पडायच्या आणि तिचे तपकिरी डोळे चमकायचे, त्यात त्याचा जीव अडकायचा. 

अशीच शाळा संपत आली आणि बघता बघता १० वीची परीक्षा सुद्धा संपली. “आता पुढे काय? काय बोलायचं वगैरे विचार आहे कि नाही? बोल आत्ताच नाहीतर कुठे कधी कसे सांगणार तिला?” ओंकार त्याला समजावून थकला पण तो आपला एकच गाणे गायचा, “मला ही मैत्री नाही गमवायची.” शेवटी एकदाचा रिझल्ट लागला. प्रतीक आणि सायली दोघेही उत्तम मार्क्सनी पास झाले आणि सर्वजण मिळून सेलिब्रेट करायला गेले. सायली आवर्जून सांगत होती सगळ्यांना, प्रतिकने कशी खूप मदत केली तिला आजारपणात ते. प्रतीकला छान वाटत होते ऐकून आणि ओंकार इकडे त्याला कोपर मारता होता. मग सगळ्यांनी आपापले प्लॅन सांगितले. सायली मात्र म्हणाली कि ती दोन चार कॉलेजना फॉर्म्स भरणार आहे. आणि ती मावशीकडे पण जाऊन येणार होती.तो पर्यंत. प्रत्येकाचे काहोतारी ठरले होते. बघता बघता सगळे फॉर्म्स भरून झाले आणि सर्वजण रिझल्टची वाट बघत होते. ऍडमिशन घ्यायची वेळ आली. कोण कुठे जाणार, सायन्स घेणार की कॉमर्स घेणार याची चर्चा सुरु झाली. प्रतीकने सायन्स ला ऍडमिशन घेतली त्याला तर डॉक्टर बनायचे होते आणि सायलीलाही डॉक्टर व्हायचे होते हे त्याला ठाऊक होते. तिनेही दोन तीन कॉलेजचे फॉर्म्स भरले होते आणि तिचे नावही लागले होते सगळीकडे पण नेमकी कुठे ऍडमिशन घेणार हे त्याला कळले नव्हते. नेमकी सायली गावाला जाऊन बसली होती आणि तिचे काही कळले नव्हते. काही अतापता नव्हता तिचा. ऍडमिशनची शेवटची तारीख जवळ आली होती. रोहनने कुठून तरी बातमी आणली कि बहुदा सायली तिच्या मावशीकडेच शिक्षणासाठी राहणार होती असे कोणीतरी त्याला म्हणाले आणि तिने तिकडेच ऍडमिशनसुद्धा घेतली होती. प्रतीकला कळत नव्हते काय चालले होते नक्की. प्रिया तर म्हणालीही होती की तिला मावशीकडे राहायला खूप आवडते आणि मावशीला मुले नसल्यामुळे सायलीवर तिचा खूप जीव होता. रोहन तेवढ्यात म्हणाला, “मला तर मस्त वाटेल असे मावशीकडे जाऊन राहायला. सॉलिड लाड होतात यार. मस्त आहे. मज्जा आहे सायलीची.” 

प्रतीकच्या काळजात धस्स झाले आणि एक क्षण त्याला वाटले त्याच्या काळजाचा ठोका चुकला. एक तीव्र वेदना सर्रकन त्याच्या चेहऱ्यावर उमटून गेली आणि ती ओंकारने पाहिली. ओंकार त्याचा जीवश्च कंठश्च मित्र, त्याला अजिबात आवडले नाही प्रतीकला असे दुखावणे. जरा रागावूनच तो म्हणाला, “हा रोहन ना बिनडोकच आहे. कोणी सांगितले रे तुला? माझी आई म्हणते तसे, देव अक्कल वाटत होता ना तेव्हा हा चाळण घेऊन गेला होता.” प्रतीकला पटकन हसू आले आणि ओंकाराचा जीव भांड्यात पडला. पण ती रात्र फार कठीण गेली प्रतीकसाठी, सारखा एकच विचार मनात येत होता, रोहन म्हणाला तसे खरेच झाले तर? सायली तिकडेच राहिली तर? तशीही सारखी मावशीचे गोडवे गात असते आणि सांगत असते कि मावशी नेहमी आईला सांगायची हिला दत्तक दे मला नाहीतर माझ्याकडेच राहू तरी दे. स्वतःलाच एक चापटी मारून घेत तो पुटपुटला आपण कशाला असे काहीतरी अभद्र बोला. असे विचार करता करता पहाटे पहाटे जरा डोळा लागला त्याचा आणि तेवढ्यात आईने हाक मारलीच, “येतोस ना रे नाश्त्याला?” वरूनच त्याने उत्तर दिले, “आलोच आई.” 

प्रतीकच घर म्हणजे एक टुमदार बंगला होता. वरच्या खोलीत तो राहायचा आणि अजून दोन तीन खोल्या होत्या वर. त्याच्या आईने सुंदर बाग फुलवली होती बंगल्याभोवती आणि त्यात एक सालीची वेलसुद्धा होती. ती बहरली की त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत असे. आजकाल विशेष करून प्रतीकच्या हे लक्षात आले होते. शेजारीपाजारी जेव्हा त्याच्या आईला सांगत, “तुमची सायली खूप सुंदर दरवळते हो. खूप प्रसन्न वाटते.” तेव्हा ‘तुमची सायली’ ऐकून उगीचच त्याला मनातल्या मनात गुदगुल्या व्हायच्या. त्याला वाटायचे आपल्याही आयुष्यात तिच्यामुळेच तर सुगंध दरवळतो. बऱ्याचदा तो त्याच्या बाल्कनीमध्ये बसून तो चहाचा घोट घेत तो सुगंध अनुभवत तिच्या विचारात हरवून जायचा. आईला काही सारखी वरखाली करायची नाही, हाक मारायाची आणि तो जायचा खाली. 

तसाच तो आजही आला, पण उठल्यावर परत तेच विचार चक्र सुरु झाले. उद्या शेवटचा दिवस ऍडमिशनचा ह्या बाईचा अजून पत्ता नाही. काही फरकच पडत नाही हिला, मीच मूर्ख, असे मनातल्या मनात म्हणत इकडे तिकडे फेऱ्या घालत तो चिडचिडत होता. “काय रे असा पिंजऱ्यातल्या वाघासारखा काय येरझाऱ्या घालतोयस? काय झाले काय?” आईने विचारले तेव्हा तो भानावर आला. “काही नाही ग, जरा भूक नाही वाटत आहे ना म्हटले थोडे चालून भूक लागेल.” असे म्हणून त्याने नाश्ता केला आणि परत वर जाऊन बसला. नेमका ओंकारही दोन दिवस मामाकडे गेला होता आणि संध्याकाळी परत येणार होता. त्यामुळे कोणाकडे बोलायचे हा प्रश्न होता. दिवसभर मनाची घालमेल चालू होती. आईने शेवटी विचारले, “काय रे बरे नाही का? असा का दिसतोस?” त्यावर नजर टाळत त्याने, “काही नाही ग, कॉलेजचा विचार करत होतो. चालू होईल ना आता बघता बघता. खूप अभ्यास करायचा आहे.” आई त्यावर हसून म्हणाली, “तुला कशाला काळजी वाटते? तू तर व्यवस्थित करतोस अभ्यास. काय रे ओंकार ने पण घेतली ना रे तुझ्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन?” असे ती विचारत असताना, “हो हो”, म्हणत तो पायात चप्पल घालून निघाला. “अरे आता कुठे जातोस?” ह्या आईच्या प्रश्नाला “आलोच ओंकारला भेटून असे म्हणत तो पळालाच. ओंकार जेमतेम घरी पोहोचला होता आणि ह्याला दारात बघून त्याला आश्चर्य वाटले. त्याने प्रतीकचा चेहरा बघितला आणि त्याला कळले काहीतरी गडबड आहे. “आई मी आलोच हा” म्हणत तो बाहेर पडला. “काय रे काय झाले? असा का दिसतोस?” त्याने प्रतीकला विचारले तेव्हा क्षणाचीही उसंत ना घेता प्रतीक म्हणाला, “अरे परवा कॉलेज सुरु होणार ना?” “हो, मग त्यात काय एवढे?” ओंकारचा प्रतिप्रश्न, “अरे यार हि बिनडोक सायली,” ओंकारने चमकून प्रतिककडे पहिले, तो कधीच असे बोलत नसे तिच्याविषयी. “सॉरी, मी असे नको म्हणायला, पण हीचा पत्ताच नाहीये यार. अजून ऍडमिशन पण नाही घेतली आहे तिने कुठे आणि प्रिया म्हणत होती कदाचित ती कायमची मावशीकडे राहील. मला कळत नाही यार. असे कसे करू शकते ती? कळत नाही का तिला?” “कसे कळणार आपल्याला आता?” ह्या त्याच्या प्रश्नांवर ,”आपण बोललात कधी तिला तर कळणार? सांगितले होते ना मी तुला, पण तू ऐकतोस कुठे?” असे ओंकार त्यालाच रागावला. “अरे यार मला नंतर ओरड, आता काय करायचे ते सांग ना?” प्रतीक व्याकुळ झाला होता. “आपण काय करणार? आपण काय तिचे गार्डियन आहोत का?” ओंकारच्या ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती प्रतीकला, “मित्र आहेस कि शत्रू माझा? फालतूची उत्तरे देतोयस. उगीच आलो तुझ्याकडे आशेने.” असे म्हणत चिडून तो निघाला. त्याला थांबवत ओंकार म्हणाला, उद्याचा दिवस आहे. काळजी नको करुस, येईल अरे ती. अशी कशी राहील तिकडे?” त्याच्या ह्या बोलण्याने प्रतीकला धीर आला थोडा पण ओंकारला स्वतःलाच खात्री नव्हती कसली. त्याने प्रतीकला घरी पाठविले आणि तो घरात आला. दुसरा दिवस पण संपला आणि प्रियाकडून कळले की सायली अजून आलीच नव्हती. 

आज प्रतीकला तीव्रपणे वाटत होते सर्व काही संपले, मीच मूर्खपणा केला, ऐकले असते ओंकारचे आणि मन मोकळे केले असते आधीच तर ही वेळच आली नसती, निदान एक कल्पना तरी द्यायला पाहिजे होती आडून. आता बसा देवदास बनून. मैत्री टिकवतायत, इथे मैत्रीणच गायब व्हायची वेळ आली आहे. गेली ती गेलीच, बिनडोक कुठली. आज पहिल्यांदा त्याचा एवढा सात्विक संताप झाला होता. एवढेही कळू नये माणसाला, बेजबाबदार कुठली. असे मनात बडबडत तो ओंकारच्या घरापर्यंत कधी आला ते त्यालाच कळले नाही. त्याच्या दारात उभा राहून त्याने ४/५ वेळा बेल मारली. ओंकार धावतच आला आणि पाठोपाठ त्याची आईही. “काय रे बाळा काय झाले? अशी का बेल मारलीस? बरे आहे ना सगळे?” तो एकदम गडबडला आणि त्याला जाणवले त्याने काय केले ते पण त्याला काही सुचेना काय सांगावे. ओंकारला अंदाज आला, त्याने ताबडतोब बाजू सावरत सांगितले, “अग मीच त्याला बोलावले होते आणि बजावले होते वेळेवर ये त्यामुळे धावत आला असेल तो. आम्हाला जरा चौकशी करायला जायचे होते कॉलेजसाठी.” प्रतिकने सुटकेचा श्वास सोडला. “चल रे आधीच उशीर झाला आहे, मग जेवायला परत यायचे आहे वेळेवर नाहीतर आई रागावेल,” असे म्हणत त्याने प्रतीकला घेऊन काढता पाय घेतला. “काय रे बाबा!” म्हणत त्याने प्रतीककडे बघितले आणि त्याला जाणवले आज नूर काही वेगळाच आहे. प्रतीकच डोळे पाणावले होते आणि तोंडातून शब्द फुटत नव्हते. ओंकारने फक्त त्याच्या खांद्यावर घट्ट हात रोवला आणि प्रतीकच्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळलेच. ओंकार काही बोलला नाही. थोडा शांत झाल्यावर त्याने प्रतीकला सांगितले, “चल चहा पिऊ.” असे म्हणत तो चहाच्या टपरीवर त्याला घेऊन गेला आणि बळेच त्याला कटिंग पाजले. त्याला प्रतीकला असे बघवत नव्हते पण काय करावे कळतही नव्हते. त्यालासुद्धा सायलीचा राग आला होता. ज्या सायलीला त्याच्या मित्राने मदत केली ती आज अशी त्याची परीक्षा बघत होती. चांगलाच जाब विचारायचा होता त्याला सायलीला पण काही विचारायला ती होती कुठे? त्याच्या मित्राला रडवले होते तिने आणि ह्यासाठी तो तिला कधीच माफ करणार नव्हता. थोडा वेळ त्यांनी इकडेतिकडे भटकण्यात घालवला आणि शेवटी ओंकार त्याला बळेच आपल्या घरी जेवायला घेऊन गेला. आईने प्रेमाने विचारले, “काय रे बाळा आज जेवत नाहीस नीट. तुला आवडते ना माझ्या हातचे जेवण?” पण तो आपला शांत. ओंकारच मध्ये पडत म्हणाला, “काही नाही ग, आम्ही एकेक वडापाव खाल्ला ना. चाल रे आटप लवकर एक मस्त मुव्ही आलाय तो बघायला जाऊया. उद्या पासून कॉलेज आहेच. दोन घास पोटात ढकलून दोघे बाहेर पडले. प्रतीकला अजिबात इंटरेस्ट नव्हता पण ओंकार आज त्याला एकटा सोडायला तयार नव्हता. मूव्हीमुळे प्रतीकचा थोडा वेळ बरा गेला पण तरीही त्याचे लक्ष मात्र लागत नव्हते. रात्री शेवटी ओंकारने त्याला घराजवळ सोडले आणि त्याच्या खांद्यावर थोपटून काही ना बोलता तो निघून गेला. त्याला प्रतीकची घालमेल कळत होती. त्याने प्रतीकला सांगितले, “आता शांतपणे झोप. उद्या बघू.” प्रतीकला त्या वाक्याचाही खूप आधार वाटलं त्या वेळी. खूप थकवा जाणवत होता त्याला आणि गादीवर पडल्या पडल्या प्रतीकचा डोळा लागला. खूप खचला होता तो मानसिकरीत्या. त्याची प्रेम कहाणी सुरु होण्याआधी संपली होती जणू, कायमची. 

दुसऱ्या दिवशी उदासपणे तो कॉलेजला निघाला तेव्हा आईने काळजीने विचारले, “काय रे झोप झाली ना नीट? एवढे दमेपर्यंत कशाला फिरायचे काल? माहित होते ना आज कॉलेज आहे ते?” तिने दिलेला डब्बा हातात घेत, “हूं” एवढेच म्हणून तो बाहेर पडला. बस स्टॉप वरून त्यांने आणि ओंकारने बस पकडली आणि ते कॉलेजला निघाले. सगळी मुले उत्साही दिसत होती. ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळणे म्हणजे नशीबच होते, त्यामुळे सर्वजण खूपच आनंदात होते. नशिबाने ओंकार बाजूच्याच क्लास मध्ये होता. ब्रेक च्या वेंळी दोघे भेटले पण प्रतीक अजूनही उदासच होता. ह्याच कॉलेजला यायचे हे त्याचे स्वप्न होते पण आज तो उत्साह आणि आनंद कुठेही दिसत नव्हता. दिवस संपला आणि दोघेजण परत आले. आईने विचारले, ” काय रे मज्जा आली का तुझ्या आवडत्या कॉलेजमध्ये?” ह्यावर कसनुसे हसत त्याने मान डोलावली. आईला वाटले दमून आले माझे बाळ. ती म्हणाली, “लवकर आटप आणि जेऊन झोप पाहू.” तो हो म्हणून वर खोलीत गेला पण त्याला ठाऊक होते की झोपेचे आणि त्याचे सूत्र काही दिवस जमणार नव्हते. 

एक आठवडा गेला असा आणि हळूहळू अभ्यासामुळे प्रतीक बिझी झाला. पण मन अजून स्थिरावत नव्हते. शनिवार- रविवार मित्रांना भेटण्यात गेले तेही जरा जबरदस्तीचे ओंकार ने नेल्यामुळे आणि परत कॉलेज चालू झाले. दुसऱ्या दिवशी ओंकारला बाय करून तो वर्गात शिरला आणि तिथेच थबकला. त्याला क्षणभर कळेना तो कुठे आला होता. कोणीतरी त्याला हात हलवून बोलावत होते आणि त्याला काही कळत नव्हते. तो वेड्यासारखा तिकडेच उभा राहिला. शेवटी, “अरे प्रतीक!” ही जोराची हाक ऐकून तो भानावर आला. सायली होती समोर. जोरजोरात हात हलवत त्याला हाका मारत होती. “अरे काय म्हणते मी? कळतेय का तुला?” तो नुसताच हसत उभा राहिला होता आणि ती प्रश्न विचारत होती. “अरे हसतोस काय? वेडा आहेस का? बोल ना.” पण तेवढ्यात लेक्चरची बेल वाजली आणि प्रेफेसर आले. सायली जाऊन तिच्या नवीन मैत्रिणी शेजारी बसली आणि प्रतीक जागा मिळाली तिकडे बसला. आज त्याने मन लावून सगळी लेक्चर्स ऐकली. सायली पण मन लावून ऐकत होती. ब्रेक मध्ये ती प्रोफेसर्स ना भेटायला गेली आणि तो पर्यंत ओंकार आलाच. प्रतीकला पाहून तो क्षणभर गोंधळाला. हाच का तो प्रतीक जो गेले ८/१० दिवस देवदास बनून फिरत होता? आणि आता चक्क हसतोय? “काय रे बाबा लॉटरी लागली कि काय तुला?” त्याने आश्चर्याने विचारले. “अरे मग एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली म्हणजे लॉटरीच नाही का? खुश नको का असायला? सगळ्यांना नाही मिळत बरे.” हे ऐकून आता ओंकारच चक्कर येऊन पडायचा शिल्लक होता. “हे कळायला ८ दिवस जावे लागले काय रे माकडा? डोके फिरवलेस माझे. देवदास झाला होतास ८ दिवस तेव्हा काय? देव अक्कल वाटत होता तेव्हा चाळण घेऊन गेला होतास काय?” असे म्हणून ५/६ गुद्दे घालत तो विचारात राहिला, “सांग सांग, आत्ता प्रकाश पडला का तुझ्या मेंदूमध्ये?” प्रतीकला मार पडत होता पण तरीही तो हसत होता. “नक्कीच परिणाम झालाय तुझ्या डोक्यावर? माझे जिणे हराम करून ठेवले होतेस आणि आता दात दाखवतो आहेस? दात पडून टाकीन तुझे.” हे चालू असताना मागून आवाज आला, “ओह वॉव! मी पहिल्यांदा बघतेय तुम्हाला असे.” ओंकार गर्रकन वळला आणि आ करून उभा राहिला, आणि जवळ जवळ ओरडलाच, “तू? तू काय करतेयस इथे?” सायली गडबडली, “इथे नको यायला पाहिजे होते का मी? चुकले का माझे काही? जाऊ का मी?” “ए नाही नाही, प्लिज जाऊ नकोस आता. परत डोक्याला त्रास” ओंकार पटकन बोलून गेला आणि मग त्याने जीभ चावली. “परत म्हणजे? मला कळले नाही? आणि काय त्रास डोक्याला? माझ्यामुळे काही प्रॉब्लेम झाला का तुम्हाला? तसे असेल तर सॉरी, जाते मी” असे म्हणून ती हिरमुसली झाली आणि वळली जायला तेवढ्यात ओंकार ने तिचा रस्ता अडवत सांगितले, “अग बाई, तुझ्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ग,” तूच तर प्रॉब्लेम होतीस. हे वाक्य मात्र मनात होते. “अग म्हणजे तूला नोट्स वगैरे हव्या असतील ना ८ दिवसाच्या, तू नव्हतीस ना, कोण देणार तुला नोट्स? मग प्रॉब्लेम होईल ना असे म्हणायचे होते मला. प्रतिककडे नोट्स आहेत त्या तू घेऊ शकतेस ना.” असे म्हणत त्याने हळूच हसून प्रतीककडे बघितले आणि कशी संधी मिळवून दिली आहे तुला असे सूचक हसला. पण सायलीच ती, सुधारणार थोडी होती अशी. “नाही नोट्स नको मला. मला मिळाल्या मंजिरीकडून.” आता दोघांनी कपाळाला हात मारून घेतला. “काय झाले?” सायलीने विचारले त्यावर “काही नाही, मंजिरीला विसरलोच आम्ही” अशी सारवासारव करत ओंकारने विषयच बदलला. “अग पण तू ८ दिवस कुठे होतीस? मिस केले ना खूप.” ह्यावर प्रतील ने जोरात त्याचा हात दाबला. “काय मिस केले?” अजून एक बावळट प्रश्न. “अग अभ्यास” प्रतिकने सारवासारव केली. “लेक्चर्स मिस केलीसना असे म्हणायचे आहे त्याला. पण तू ऍडमिशन कधी घेतलीस?” असे विचारात त्याने विषय बदलला. “अरे ती एक स्टोरीच आहे.” असे म्हणून तिने जे काही झाले ते सांगितले. कशी ती मावशींकडून निघणार होती आणि अचानक मावशीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले आणि तिला निघत येईना आणि मग कशी तिच्या चुलत बाहिणीने तिची ऍडमिशन ती नसताना घेतली ही सगळी कथा साग्रसंगीत सांगितली. प्रतीकचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते पण मनोमन त्याने तिच्या बहिणीचे खूप आभार मानले. आज त्याचे हात स्वर्गाला पोहोचले होते, की स्वर्ग त्याच्याकडे चालत आला होता देव जाणे. घरी गेल्यावर त्याने आईला आल्याच्या चहाची फर्माईश केली आणि आईला कळले आज स्वारी खुशीत आहे. का ते नाही कळले पण एकंदर त्याला हसताना पाहून तिला फार बरे वाटले. 

आता २ वर्षे तरी सोबत नक्की होती. दररोज गप्पा व्हायच्या असे नाही पण एकाच वर्गात असल्यामुळे भेट तरी व्हायची. ओंकारने ने आता धोशा लावला होता, “आता तरी तोंड उघड बाबा.” आणि प्रतीक ने प्रॉमिस केले की हे वर्ष संपले की नक्की बोलणार कारण तिलाही डॉक्टर बनायचे होतें म्हणजे दोन वर्षांनी सुद्धा एकत्र राहण्याचे, एकाच कॉलेजला ऍडमिशन घेण्याचे फिक्स करता येईल. त्याला स्वतःलाच ही आयडिया खूप आवडली. ह्या वर्षी आधी रिझल्ट चांगला आणायचा म्हणजे आपली बाजू जरा अजून पक्की होईल आणि कॉन्फिडन्स पण येईल असा विचार करून त्याने अभ्यासावरही जोर मारला.

पण अभ्यासाबरोबर कॉलेजमध्ये अजूनही काही असते ना. इकडे कॉलेजमध्ये रोज डेची तयारी सुरु झाली होती. रोज डे आला आणि सायलीला १०/१२ गुलाब मिळाले. हे बघून दोघेही परत घाबरले. प्रतीक स्वतःसाठी आणि ओंकार त्याच्यासाठी. ओंकारला काळातच नव्हते प्रेमकथा कोणाची, टेन्शन कोणाला आणि काय चालले आहे ते. तो एकदम सरळ म्हणाला, “काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लाव रे बाबा. माझे म्हणजे खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आना असे झाले आहे. उगीच आपले माझे ब्लड प्रेशर वाढते. तुझा पहिला पेशंट व्हायची अजिबात इच्छा नाही आहे माझी. 

पण सायलीनेच परस्पर हा प्रश्न सोडवला होता. तिने सरळ सांगितले की त्या मुलांना ती धड ओळखतही नव्हती आणि तिला ह्या सगळ्यात असा काही इंटरेस्टही नव्हता. हे ऐकून दोघांना हायसे वाटले आणि चिंता मिटली पण परत प्रतीकची गाडी थोडी रिव्हर्समध्ये गेली होती. पण त्याने विचार केला इंटरेस्ट नाही हे चांगलेच आहे. आपणही थांबू पाहिजे तर. काय घाई आहे? अजून एक वर्ष आहेच. ती आपली ह्या ग्रुपवर आणि मैत्रीवर खुश होती. त्यातही कधी कधी ओंकार नसायचाच आणि प्रतीकचा अभ्यासावर असलेला फोकस तिला आवडायचा. वर्ष बघता बघता संपले आणि शेवटी प्रतीक ने ठरवले आता छान रिझल्ट आला आहे तर आता निदान एक खडा टाकून बघू, अंदाज घेऊ आणि मग आपले मन मोकळे करू. 

त्याने सायलीला विचारले, “कॉफी प्यायला जायचे का आपण तिघे? असेच रिझल्ट सेलिब्रेट करायला.” अर्थात प्लॅन हाच होता कि ओंकार ऐनवेळी गायब होणार. सायली म्हणाली ,”दोन चार दिवस जरा गडबड आहे मग जाऊ आपण शांतपणे.” ठरले, मस्त आयडियल कॅफेमध्ये जायचे. तिकडे बाहेर मस्त गार्डन आहे समोर. शांत वातावरण. कोणाची घाई गडबड नाही, गंधाळ नाही आणि तिकडची कॉफी सायलीला खूप आवडायची. जसजसे दिवस जवळ येऊ लागला तसतशी प्रतीकची घालमेल सुरु झाली. काय बोलायचे, कसे बोलायचे, काही सुचेना, श्वास अडकू लागला, कुठलीही आयडिया पटेना. पिक्चर मध्ये दाखवतात तसे गुलाब घेऊन जाऊ कि शायरी करू? की सरळ विचारून टाकू, तुला मी आवडतो का? पण मग भीती वाटली, नाही म्हणाली तर? त्यापेक्षा मला तू खूप आवडतेस हे सांगितले तर कदाचित माझा विचार तरी करेल. पण जर म्हणाली आपण मित्रच बरे आहोत तर? नंतर? कसे होईल आमचे नाते? कसे नॉर्मल राहू? कसे फेस करू एकमेकांना? एकाच वर्गात असणार आणि ‘जस्ट फ्रेंड्स’?, विचारांचे काहूर माजले होते. पण मग त्याने स्वतःलाच समजावले, ती नाही म्हणेल असाच का विचार करतोय मी? हो सुद्धा म्हणू शकेल. कदाचित तिलाही मी आवडत असेन पण समजत नसेल. विचारून टाकू एकदाचे म्हणजे ही घालमेल आणि टेन्शन तरी जाईल कायमचे. हो म्हणाली तर एकत्र एकाच कॉलेजमध्ये आहोतच, डॉक्टरसुद्धा एकत्रच बानू. एकत्र प्रॅक्टिस आणि दोघांची मिळून मोठी डिस्पेन्सरी. काय मज्जा येईल. लाईफ सेट. 

शेवटी ती संध्याकाळ आली आणि नाही म्हटले तरी प्रतीकच्या पोटात गोळा आलाच. छान निळा आणि पांढरा चौकडीचा शर्ट आणि काळी जीन्स असे सायलीचे फेवरीट कॉम्बिनेशन घालून तो तयार झाला. केस थोडे विंचरलेले पण थोडे विस्कटलेले वाटतील असेच होते, जे सायली सांगायची की त्याला खूप सूट करतात. छान परफ्युम आणि चकाचक शूज घालून तो निघाला तेव्हा आईने विचारले, “आज कुठे स्वारी नटूनथटून?” पोटातला गोळा अजून थोडा वाढला. हिला कळले कि काय? पण तिनेच विचारले, “ओंकार भेटणार असेल ना? त्याला सांग मी आठवण काढली आहे. आला नाही बऱ्याच दिवसात.” “हुश्श!” सुटलो. नाही कळले हिला. “हो नक्की सांगतो” असे म्हणून अजून प्रश्न यायच्या आत त्याने काढता पाय घेतला. 

जसजसे कॅफे जवळ येऊ लागला तसतशी त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. सायली आली आहे का हे पाहण्यासाठी त्याने इकडे तिकडे नजर टाकली पण ती अजून पोहोचली नव्हती हे पाहून त्याला थोडा धीर आला. त्याने थोडे डीप ब्रीदिंग केले, थोडा जास्त ऑक्सिजन साठवला छातीत आणि तेवढ्यातच सायली आली. “हाय! हे काय ओंकार अजून पोहोचला नाही? तुझ्या बरोबर नाही आला? कुठे गेला?” प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली नेहमीप्रमाणे. प्रतिकने आणलेले उसने अवसान गाळून पडायची वेळ आली आणि क्षणभर त्यालाही वाटले ओंकार पाहिजे होता यार. पण नाही ही लढाई माझी आहे आणि मलाच लढली पाहिजे असे म्हणत आणि परत थोडा दीर्घ श्वास भरत तो म्हणाला, “ऐकशील का, मला जरा बोलायचे होते म्हणजे ….. काही सांगायचे आहे …. ऍक्च्युली एक सरप्राईज द्यायचे होते….” पण शेवटचे वाक्य फक्त त्याच्या हातातल्या पाण्याच्या ग्लासने ऐकले होते. त्याला कळतच नव्हते सुरुवात कशी करू आणि हिची गाडी थांबायला तयारच नव्हती. तिने एक बॉक्स उघडला आणि त्यात एक छोटासा केक आणला होता. त्यावर लिहिले होते “काँग्रॅच्युलेशन्स टु अस”. प्रतीकला मनावर मोरपीस फिरल्यासारखे वाटले. ‘अस’, ‘आपण’, किती मस्त. शेवटी एकदा माझ्या भावना पोहोचल्या तर. उगीच माझ्या जीवाची घालमेल आणि नाही ते विचार मनात आणत होतो मी. आता ही छान बातमी ओंकारला कधी सांगतो असे झाले होते त्याला; “काय रे कसा वाटला?” भानावर आणत तिने त्याला विचारले. “खूप छान ग. पण हे सगळे काय? कशासाठी?” “तुला काहीच कळत नाही का रे? आपण दोघे किती छान मार्क्स मिळवले, सेलिब्रेट नको का करायला आपला सक्सेस?” तिचे ‘आपला, आपण दोघे’ हे शब्द फार सुखावत होते त्याला आणि अगदी ढगांवर तरंगल्यासारखे वाटत होते. “तुला एक विचारायचे होते. बरे झाले ओंकार नाही आला ते.” अजून एक आनंद लहर सळसळून गेली. “काय?” जवळ जवळ कापऱ्या आवाजात त्याने विचारले. सायलीसुद्धा अधीरपणे बोलत होती, “पण आधी प्रॉमिस कर की कोणाला सांगणार नाहीस इतक्यात.” प्रतीक खुर्चीवरून खाली पडायचा बाकी होता. त्याला वाटले त्याचे हृदय जे जोरजोरात धडधडत होते त्याचे ठोके बाहेर सायलीलासुद्धा ऐकू येणार कि काय. जेमतेम आवाजावर ताबा मिळवत त्याने विचारले, “अग, पण काय?” सायलीचा आपला एकाच धोशा “तू प्रॉमिस तर कर आधी.” शेवटी धडधणाऱ्या स्वतःच्या हृदयावर हात ठेवत तो म्हणाला, “प्रॉमिस”. सायली टेबलावर पुढे वाकत हळूच त्याच्या जवळ जात म्हणाली, ” खरेतर कधीपासून तुला सांगायचे होते पण योग्य वेळेची वाट बघत होते.” प्रतीक अगदी अधीर झाला होता पुढचे शब्द ऐकण्यासाठी. जे त्याला सांगायचे होते ते सायली कडून ऐकायला मिळणार होते. त्याचे हात तर जवळ जवळ थंड पडले होते. सायली म्हणाली, “प्रतीक, तू माझा हिरो आहेस. तू अभ्यासात सॉलिड आहेसच पण माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहेस. शाळेत ना मला नीट कळले नाही रे. आपली मैत्री कशी आपली मजा मस्करी, पण आता ना तुझ्यावर खूप अवलंबून असते रे मी.” प्रतीकला आता वाटत होते ही प्रस्तावना पुरे आणि बस्स पटकन तिने सांगून टाकावे कि मी हिला आवडतो. मला तर ही आवडतेच तेव्हापासून, हिलाच तर कळत नव्हते. आता असे सांगते आहे जसे काही मलाच काही कळत नाही. बोल लवकर सायली बोल. “प्रतीक माझे ना स्वप्न आहे रे, मला ना खूप मोठे डॉक्टर व्हायचे आहे तुझ्यासारखे आणि ते सुद्धा मोठ्या कॉलेज मधून. आपण दोघे एकत्र प्रॅक्टिस करू मग मस्त. प्रतीकांचा विश्वास बसत नव्हता, त्याचे स्वप्न आणि तिचे स्वप्न एकाच होते. तुला माहित आहे गम्मत, बाबांची ना दिल्लीला बदली होते आहे रे आणि मी पण तिकडच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे. मला तर खूप मस्त वाटली ही कल्पना. वेगळे शहर, ती पण आपली राजधानी. एक अनुभव. मला तर जाम थ्रिलिंग वाटते आहे. तुला काय वाटते?” एव्हाना प्रतीक पूर्ण बधिर झाला होता. त्याचा त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता आणि जे ऐकले होते ते मेंदू पर्यंत पोहोचत नव्हते. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला होता आणि मन सुन्न झाले होते. तो नुसताच शून्यात बघत होता आणि सायली त्याला गदागदा हलवित विचारात होती, “अरे काय म्हणते आहे मी? काहीतरी बोल ना? तुझे मत खूप महत्वाचे आहे रे माझ्यासाठी. तुला माझे स्वप्न माहित आहे ना? खरे तर तूच माझी इन्स्पिरेशन आहेस. तुझे डेडिकेशन बघून तर मी प्रोत्साहन घेतले. बोल ना रे काहीतरी.” आता सायली खूप अगतिकपणे बोलत होती आणि तिला असे विवश बघणे प्रतीकला मान्य नव्हते. कसेबसे उसने अवसान आणत त्याने मान हलविली, “छानच आहे ही कल्पना. तुझे स्वप्न पूर्ण होणार ह्यापेक्षा अजून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी कोणती असणार? तू योग्यच विचार केला आहेस. बरे ऐक आपण ह्या विषयावर नंतर बोलूया का? आईने ना एक महत्वाचे काम दिले आहे ग. विसरूनच गेलो होतो. निघूया आपण?” असे म्हणत तो उठतच होता आणि सायलीने त्याचा हात घट्ट पकडला, “केक तरी कपूया ना रे. असे काय करतोस.” क्षणभर प्रतीकला वाटले हा क्षण असाच राहावा, आपला हात सायलीच्या हातात कायम राहावा. अन परत त्याला अगतिक झाल्यासारखे वाटले, आपला चेहरा हिला वाचता येऊ नये ही देवाकडे प्रार्थना करत तो खोटे हसू आणत खाली बसला.” सायलीचा चेहरा आनंदाला. त्याच्यासाठी हेच महत्वाचे होते. “तू खूप मोठी मदत केली आहेस माझी आणि आपण सेलीब्रेट तर केले पाहिजे ना. तू सोडून कोण आहे अजून माझ्या आनांदात खरा आनंद मानणारे.” सायलीने केक कापला आणि एक तुकडा त्याच्यासमोर धरला. त्याने तिची नजर चुकवत तो घेतला आणि खूप खुश असल्याच्या अविर्भावात खाल्ला. “निघूया आता? खूप उशीर झालाय मला.” एक अगतिकता त्याच्या आवाजात जाणवून गेली त्याचा चेहरा अगदी निस्तेज झाला होता. सायलीला थोडा वेळ कळेना नक्की काय झाले. “आई रागावेल काय रे उशीर झाला म्हणून?” तिने नेहमीच्या निरागसपणे विचारले. इतकी गोंडस दिसली ती आणि थोडा वेळ प्रतीक विसरून गेला कि हा गोड चेहरा आता त्याला काही दिवसांनी दिसणार नाही. वास्तव फार कटू असते. “नाही ग बघेन मी काय ते, फक्त निघूया आपण” असे म्हणत तो निघालाही. ह्यावेळी मागे वळूनही पाहिले नाही त्याने सायली निघाली की नाही. त्याला भीती होती पटकन डोळे पाणावले तर काय उत्तर देणार होता तो. 

भराभर पावले उचलत तो निघाला, त्याला कळत नव्हते कुठे ते पण तो चालत होता पावले नेत होती तिकडे तो जात होता. एव्हाना धो धो पाऊस कोसळू लागला होता पण त्याला तेही भान नव्हते तो तसाच भिजत चालला होता आणि पावसामुळे त्याचे अश्रूही कोणाला दिसणार नव्हते. अचानक त्याचे मनगट कोणीतरी घट्ट पकडल्याची त्याला जाणीव झाली आणि तो थांबला. ओंकार! कसा देवासारखा धावून आला. ओंकार ने त्याला दुकानाच्या शेडमध्ये घेतले. “काय रे एवढी घाई? मित्र पण दिसेनासा झाला आता? काम झाले ना आता तुझे? अरे पण माझा राज कपूर, तुझी नर्गिस कुठे आहे आणि छत्री कुठे आहे? असा का भिजत चाललास? तेही एकटा? सायली कुठे आहे? ” हे ऐकले आणि प्रतिकने त्याला घट्ट मिठी मारली. ओंकारला वाटले चला एकदाचे गंगेत घोडे न्हाले पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले प्रतीक थरथरत होता आणि हुंदके देत होता. सर्रकन एक काटा त्याच्या अंगावर शहराला. त्याने प्रतीकला दूर सारत समोर उभे केले. हातात रुमाल कोंबला आणि चेहरा पुसायला सांगितले. प्रतीकचे डोळे संपूर्ण पाणावले होते, गोरा चेहरा लालबुंद झाला होता आणि त्याला काही बोलता येत नव्हते. त्याने प्रतीकला असे कधीच बघितले नव्हते, एवढे हतबल, एवढे विवश. त्याच्या काळजात चर्र झाले. सायली नाही म्हणाली की काय? पण नाही का म्हणेल? तिला तर हा आवडतो असे वाटायचे? काय बोलला हा आणि कसे, काय माहित? सगळे शिकवायला लागते ह्याला. मी असायला हवे होते बरोबर. उगीच ह्याला एकट्याला पाठवले. “अरे काय झाले बोलशील का? जीव घेशील आता साल्या, बोल ना काहीतरी.” पण प्रतीक उभा थरथरत होता. ओंकार ने त्याला एका अंधाऱ्या बाजूला उभे केले जेणेकरून त्याची अवस्था कोणाला दिसू नये. एका हाताने त्याला घट्ट पकडून त्याने पटकन पाण्याची बाटली घेतली. बळेच त्याने प्रतीकला पाणी प्यायला लावले आणि तसाच हात धरून जवळच असलेल्या एका शांत हॉटेलमध्ये घेऊन गेला जिथे कोणाची जास्त ये जा नसे. तिकडे बसवून त्याने आधी प्रतीकला शांत होऊ दिले. थोड्या वेळाने प्रतिकने जेमतेम दोन शब्द उच्चरले, “ती चालली रे ओमी”, ओंकार ला काही कळत नव्हते. कोण चालली?कुठे चालली? कोणाविषयी बोलतोय हा? त्याला हा सस्पेन्स आता सहन होईना, “अरे कोण चालली आणि कुठे?” तो वैतागला होता. “सायली”, तिचे नाव घेतानाही प्रतीक शहराला. त्याला ही कल्पनाच सहन होत नव्हती आणि त्याहूनही मान्य होत नव्हती. “काय?” ओंकार जवळजवळ ओरडलाच, “अरे कुठे चालली?” “दिल्लीला”, परत एक तोडकेमोडके उत्तर देत प्रतीक स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. “काय डोके फिरले का तुझे? कोणी सांगितले तुला हे?” ओंकार त्याच्यावर चिडून विचारात होता. “तिने स्वतः. तिच्या बाबांची बदली होते आहे आणि ती त्यांच्याबरोबर जाणार आहे” खूप मोठा आवंढा गिळत प्रतीक पहिल्यांदा पूर्ण वाक्य बोलला. ओंकारला संदर्भच लागत नव्हता हे कसे झाले अचानक. “अरे मग बोललास की नाही तू तिला?” प्रतिकने नकार देत फक्त मान हलविली. बोलण्याचे भानच नव्हते आता आणि ताकद तर त्याहून उरली नव्हती. ओंकार खूप चिडला होता, “डोक्यावर परिणाम झाला आहे का तूझ्या? आजही नाही बोललास? अरे निघाली ना ती? आता तरी बोल, चल आधी, ऊठ ऊठ गाढवा.” पण प्रतीक मध्ये तेही त्राण उरले नव्हते. 

ओंकारनेच शेवटी हतबलपणे विचारले, “अरे काय करतोस असे? प्रेम आहे ना तुझे तिच्यावर? तिच्या नुसत्या जाण्याच्या विचाराने तुझी अवस्था बघ काय झाली आहे. नंतर काय करणार आहेस तू? का नाही सांगत तू तिला?” थोडा वेळ गेल्यावर स्वतःला सावरत प्रतीक म्हणाला, “ओंकार, माझे प्रेम आहे रे तिच्यावर, पण मला त्या प्रेमाची बेडी नाही घालायची तिच्या पायात. तिला खूप शिकायचे आहे आणि मोठे व्हायचे आहे. तिचे स्वप्न उध्वस्त करून नको आहे रे ती मला. तिला झुरताना नाही पाहू शकणार मी. ते अजून कठीण जाईल मला.” आता ओंकारकडे काही उत्तर नव्हते. एकीकडे त्याचा जीवही तुटत होता मित्रासाठी पण एकीकडे अभिमानाने ऊर भरूनही आला होता. असे प्रेम खरेच दुर्मिळ. 

थोडावेळ प्रतीक तसाच त्याच्या खांद्यावर डोके ठेवून शांत राहिला. मग उठत म्हणाला, “चल जाऊया. आई काळजी करेल. बाकीचे लोकही आहेत ना आयुष्यात.” ओंकार त्याला घरापर्यंत सोडायला आला. आईने काळजीने विचारले, “काय रे बाळा, असा काय दिसतोस? जाताना तर खुशीत होतास, काय झाले? काही होते आहे का आणि भिजलास कसा? छत्री न्यायाची ना रे,” असे म्हणत तिने पदरानेच त्याचे केस पुसले.”प्रतीक ने मान हलवत फक्त, “खूप डोके दुखते आहे ग. झोपतो लवकर,” एवढे सांगून मान वळवली आणि तो वर स्वतःच्या खोलीत जायला वळला. “झोप रे बाबा शांत, काही खाल्लेस का पण? गोळी देऊ का काही?” ह्या आईच्या प्रश्नाला फक्त नाकार्थी मान हलवत तो निघून गेला. खोलीत पाऊल टाकले आणि आत जाताच त्याने दाराला कडी लावली. कपडे बदलण्याचे त्राण नव्हते पण संपूर्ण भिजल्यामुळे, त्याने आधी गरम पाण्याने अंघोळ केली आणि कपडे बदलले. अंथरुणावर पडल्या पडल्या परत एकदा सगळे चित्र त्याच्या डोळ्यासमोर तरळले.

तो बसला होता कॅफेमध्ये तेव्हा छान थंड वारा सुटला होता. तुरळक काळे ढग आभाळात जमा झाले होते आभाळात. संध्याकाळ अशी कवितामय झाली होती. त्याने दुरूनच सायलीला येताना बघितले होते. तिचे रेशमी काळेभोर केस मोकळे सुटले होते आणि वाऱ्यामुळे हलकेच तिच्या गालावर रुळत होते. त्यांना मागे सारण्याचा प्रयत्न करत होती ती पण हातातल्या सामानामुळे तिला फारसे जमत नव्हते. तिचा तो सात्विक संताप आणि केस सावरण्याची धडपड बघून क्षणभर प्रतीकला वाटले आपण जावे आणि ते केस हळुवार मागे करत त्यांना विचारावे, “का त्रास देता तिला?” पण आपल्याला हे शक्य होणार नाही हे त्याला माहित होते त्यापेक्षा तिच्या हातातले सामान घ्यावे, असे विचार करत तो उठणार तेवढ्यात, परत त्याला वाटले, किती सुंदर दिसते ही अशी लडिवाळपणे केसांशी खेळताना, हिला असेच बघत राहावे. गोरापान चेहरा, हरणासारखे टपोरे डोळे, नाजूक चाफेकळी नाक आणि गुलाबाच्या पाकळयांसारखे ओठ. मेकअप करायची गरजच नव्हती तिला आणि तिलाही आवड नव्हती कृत्रिम नटण्याची. सर्वकाही नैसर्गिक दिसणे, वागणे, बोलणे, जसे आहे तसे, कुठेही खोटेपणा नाही. 

ती आली तसे हळूहळू ढग जमा होऊ लागले होते आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. पण त्याला कुठे कल्पना होती कि तो लवकरच रौद्ररूप धारण करणार आहेत आणि त्याची स्वप्ने उध्वस्त करणार आहेत. अचानक त्याला अनावर झाले आणि उशीत तोंड खुपसून तो ढसाढसा रडू लागला. त्याच्या मनावरचे ओझे कोणीही समजू शकणार नव्हते. हे गुपित फक्त त्याच्या आणि ओंकारमध्येच राहणार होते कायमचे. सायलीलाही ते कधी कळणार नव्हते. रडता रडता बऱ्याच उशिरा त्याला थकून कधी झोप लागली ते कळलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी उठल्यावरही त्याला डोक्यात ठणका आणि हृदयावर मणभर ओझे जाणवत होते. थोडा उशिरानेच तो खोलीतून बाहेर आला. आई नेमकी बाहेर गेली होती त्यामुळे त्याला थोडे बरे वाटले. काय उत्तर द्यायचे तिच्या प्रश्नांना हे त्याला कळत नव्हते. ओंकार आलाच तेवढ्यात णि म्हणाला, “चल, बाहेर जाऊ.” दोघेही बाहेर पडले. “काय करायचे आहे तुला आता? सांगणार तर नाही आहेस तिला आणि मी काही तुला देवदास बनून राहू देणार नाही.” क्षणभर का होईना पण एक हास्य झळकले प्रतीकच्या चेहऱ्यावर. “काही सुचत नाही रे. डोके सुन्न आहे झाले आहे माझे. हा प्लॅन तर बनवलाच नाही ना कधी रे.” एक खिन्न स्वर, आता मात्र ओंकारने पूर्ण चार्ज घेतला त्याचा. “मी काय सांगतो ऐक. तू म्हणालास तसेच, अजूनही माणसे आहेत तुझ्या आयुष्यात. आई बाबांना तुझा किती अभिमान आहे आणि तुझ्याकडून कती अपेक्षा आहेत. त्यांना दुःखी करणार करणार आहेस का तू? परत, सायली स्वतः करिअर करायला चालली आहे स्वतः.” हे ऐकल्यावर “मीच हिरो तिचा म्हणे. हिरो कसला? हिरो कधी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतो का?” असे हळूच पुटपुटत असताना ओंकार ने ऐकले, “म्हणजे काय? तुला हिरो म्हणाली ती तिचा?” ओंकारला कळत नव्हते. “कसला हिरो रे? चांगले परफॉर्म करून मग तिला प्रपोज करू असे ठरवले ना मी? माझ्या चांगल्या परफॉर्मन्समुळे तिला प्रेरणा मिळाली म्हणे” हे ऐकल्यावर मात्र ओंकार खरेच हसत सुटला, “च्यायला चांगल्या परफॉर्मन्सने घात झालेला पहिलाच नमुना असशील तू” प्रतीकही त्याला कसनुसं हास्य देत सामील झाला. “तर,” परत गाडी रुळावर आणत ओंकार म्हणाला, “आता तू हा परफॉर्मन्स चालू ठेव. अभ्यासावर दूर्लक्ष होऊ देऊ नकोस. ती जाते आहे निघून पण आई बाबा तुझेच आहेत. त्यांच्यासाठी कर आणि दुसरे म्हणजे अभ्यासात स्वतःला एवढे बुडव कि तिची आठवण येता कामा नये.” प्रतीक नुसते डोके हलवत होते. त्याला एक टपली मारत ओंकारने विचारले “काय? कळतंय का काही की उगीच वाऱ्यावर डोके हलते आहे?” तू एंट्रन्सची तयारी चालू करणार होतासच ना, आज पासून कामला लाग.” प्रतिकने वर बघत विचारले, “आज?” ओंकारने त्याला उठवत, “आज नाही अत्ताच”, म्हणत जवळ जवळ ओढलेच. “दोन चार दिवस जातील तुझे, विरहात झुरण्याचे, रडण्याचे. लक्ष लागणार नाही, भूक मरेल. असे सगळे नाटक करून झाले कि मग हळूहळू जमायला लागेल.” “साल्या मित्र आहेस की कोण? नाटक म्हणतोस? तुला तर आधीपासून माहित होते ना, तरी?” ओंकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला, “बास आता. सांगितले होते तेव्हाच बोल म्हणून, ज्यादा शहाणपणा केलास तो अंगाशी आलाय. आता तरी माझे ऐक, भले होईल तुझे. ती गेली, मी आहे अजून” हे ऐकल्यावर मात्र प्रतिकने ओंकारला घट्ट मिठी मारली, “यार तू पण गेलास तर माझे काय होईल? प्लिज तू तरी नको जाऊस कुठे.” त्याला आधी मिठी मारत आणि मग दूर ढकलत ओंकार म्हणाला, ” नाटक बंद बोललो ना तुला. बस झाले आता. कामाला लागा.” असे म्हणून दोघेही निघाले. मनातल्या मनात प्रतिकने देवाचे आभार मानले असा सच्चा दोस्त दिल्याबद्दल. कारण तो अजून काही बोलला असता तर नक्कीच मार खाल्ला असता त्याने. 

बघता बघता सायली दिल्लीला गेली आणि प्रतिकने स्वतःला अभ्यासात बुडवून टाकले. त्याची कॉलेजची आणि मेडिकल एंट्रन्सची तयारी सुरु झाली. दोन्हीही त्याने उत्तमरीत्या पार पाडल्या. त्याला पाहिजे असलेल्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळाली. आणि डॉक्टरकीचा प्रवास सुरु झाला. रात्रंदिवस तो अभ्यासात बुडून गेला. घरीही तो जवळ झोपण्यापुरते येत असे आणि कधी कधी तर आठवडाभर तेही जमत नसे. कधीतरीच हल्ली एखाद्या रविवारी जर तो घरी असला तर सकाळचा नाश्ता आई बाबांबरोबर गप्पा मारत आणि त्यांना त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत करत असे. त्यांना खूप कौतुक होते त्याचे. मग संध्याकाळी कॉफी पीत त्याच्या बाल्कनीमध्ये बसलेले असताना, सायलीचा सुगंध दरवळला कि कधीतरी त्याचे मन परत तिच्या आठवणींमध्ये गुंतून जात असे आणि अधीर होत असे. पण त्याला आता कुठेही स्वतःला भरकटू द्यायचे नव्हते. हे झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्याला बाहेर जायचे होते आणि स्कॉलरशिप पण मिळवायची होती, त्यामुळे अभ्यासात मन एकाग्र करणे फार महत्वाचे होते त्याच्यासाठी. बघता बघता पाच वर्षे पार पडली, इंटर्नशिप करून झाली आणि प्रतीक डॉक्टर बनला. मधल्या काळात एक दोन वेळाच तो सायलीला भेटला तेही जाणूनबुजून सगळ्यांबरोबर. त्याला परत त्याच्या भावना शिरजोर व्हायला नको होत्या. आता अभ्यासात झोकून द्यायचे होते त्याला. सायली अजूनही त्याच्या मनात होती पण तिला त्याला स्वतःची कमजोरी बनू द्यायचे नव्हते. सायलीसुद्धा खुश होती आणि पुढील स्पेशलायझेशनचे प्लॅन करत होती.प्रतीकने स्कॉलरशिप मिळविली आणि आई बाबांचा थोडा भार थोडा कमी केला. इकडे सायलीने मात्र भारतातच पुढचे शिक्षण घ्यायचे ठरवले होते हेही त्याला त्या जुजबी भेटीतच कळले होते. त्याने एकट्याने तिच्याशी काहीही बोलायचे टाळले होते. चारजणांबरोबर जे काही तो ग्रुपमध्ये बोलला असेल तेच. 

प्रतीकची इंग्लंडला जाण्याची तयारी चालू होती. बरेचसे काम झाले होते. बॅग भरता भरता तो आईशी गप्पा मारत होता आणि बेल वाजली. आई म्हणाली, “मी बघते रे, तू कर काम आपले.” तो हो म्हणाला आणि आवारात होता. थोड्या वेळाने आईची हाक आली, “बघ रे कोण आलेय तुला भेटायला,” हे ऐकून, त्याने ना पाहताच “ओंकारला वर यायला सांग,” असे सांगून टाकले. “अरे बघ तरी आधी येउन” हे ऐकल्यावर, तो जिन्याने काही येत येताच थबकला, सायली उभी होती दारात. “अरे, हि सायली ना? किती वर्षांनी बघितली हिला. किती वेगळी दिसते आता. दिल्लीचे पाणी चढले बरे का थोडे.” असे आई बोलत असताना हळूहळू प्रतीक उतरून आला. सायली थोडी बदलली होती, खरी, केस थोडे कापले होते पण खूप लहान नव्हते केले. रंगरूप तसेच होते पण थोडा कपड्यांचा चॉईस बदलला होता. थोडीशी मॉडर्न आणि बरीचशी तशीच. प्रतीक खाली पोहोचला आणि “हाय! कशी आहेस?” असे विचारत असताना आई म्हणाली, “तिला आत तरी बोलावं.” मी चहाचे बघते म्हणत आई आत निघाली तेव्हा सायलीने गडबडीनेच तिला अडवत सांगितले, “नको काकू, तुम्ही नका त्रास घेऊ, आम्ही जाऊ बाहेर कॉफी प्यायला. चालेल का रे प्रतीक?” तिने विचारले पण प्रतीकने “अगं जरा पॅकिंग बाकी आहे” असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रेम तो विसरला नव्हता फक्त त्याने ते पार तळाशी गाडून टाकले होते. पण आईच जेव्हा म्हणाली, “जा रे जरा, पॅकिंग होईल. मी मदत करेन तुला” तेव्हा मात्र तो तिला टाळू शकला नाही. ह्यावेळी प्रतीकला पर्याय नव्हता कारण ती घरी आली होती. “चल ना जरा बाहेर चक्कर मारून येऊ.” हे ऐकून तो, “बस तू, मी येतोच कपडे बदलून,” असे म्हणत वर खोलीत गेला. अजूनही सायली दिसली की एक हुरहूर वाटायची त्याला. त्याच नादात तो तयार झाला. नकळत त्याने निळा शर्ट चढवला आणि केस हातानेच नीट करत खाली आला. आईला “येतो हा लगेच,” असे म्हणत दोघेही बाहेर पडले. 

अजूनही प्रतीक थोडा अस्वथ होता नि मोकळेपणी बोलत नव्हता. एक्दम जुजबी, कॉलेज विषयी, दिल्ली विषयी बोलणे चालले होते. तिचा भारतात राहण्याचा निर्णय त्याला ठाऊक होता. बोलत बोलत ती त्याला त्याच कॅफेमध्ये घेऊन गेली आणि प्रतीकांची पावले अडखळली. त्या दिवसानंतर तो तिकडे कधीच गेला नव्हता. “इकडे?” त्याने चमकून विचारले. “हो. का काय झाले? काही प्रॉब्लेम?” तिने त्याच पूर्वीच्या इनोसेंस ने विचारले आणि प्रतीकला हसू आले. “नाही, काही नाही.” असे म्हणत त्याने तिच्याकडे बघितले. “हसलास का?” तिने विचारले आणि हे बोलताना परत एकदा एक केसांची बट तिच्या गालांशी खेळत होती हे प्रतिकच्या लक्षात आले. प्रतीक परत गुंग होऊन तिच्या गुलाबी गालांशी खेळणाऱ्या त्या बटेकडे बघत राहिला. त्याला वाटले मागे करावी ही बट, जी दरवेळी घायाळ करून जाते. “काय रे सारखा हरवतोस कुठे?” हे ऐकताच तो भानावर आला. “चल ना आत,” असे म्हणत सायली त्याला आत घेऊन गेली. नेमके तेच टेबल आणि प्रतीक परत अडखळला. पण ह्यावेळी मात्र स्वतःला सावरत पटकन खुर्ची ओढून बसला. बसला. परत काही प्रश्न नको होते त्याला.

“अजूनही हा कॅफे असाच आहे नाही?” सायली सहज म्हणाली. “बऱ्याचशा गोष्टी अजूनही तशाच आहेत पण जाणवत नाहीत.” नकळत प्रतीक बोलून गेला आणि सायलीने त्याच्याकडे चमकून बघितले. “तू कॉफी मागावं ना,” असे म्हणत त्याने विषय बदलला. सायलीने विचारले, “स्ट्रॉंग कॉफी आणि एक चमचा साखर फक्त बरोबर?” प्रतीकला आश्चर्य वाटले, हिला लक्षात आहे? जणूकाही सायलीने त्याचे मन वाचले, “मला लक्षात आहे अजून ह्याचे आश्चर्य वाटले का?” क्षणभर प्रतीकला वाटले आपला चेहरा एवढे बोलका झाला आहे की काय? आणखी काय काय कळेल हिला देव जाणे. त्याने फक्त हसून मन हलवली. “मी काहीच नाही विसरले रे. मी दिल्लीला गेले, माझे स्वप्न पण साकार झाले पण म्हणून मी सगळे विसरले असे नाही. तूच भेटला नाहीस नीट कधी बोलायला. एवढ्या वर्षात एक दोन वेळा भेटलास ते पण सगळ्यांसोबत. आठवते हे टेबल. इकडेच बसून आपण सेलेब्रेट केले होते. मी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा. खूप छान कॉलेज मिळाले आणि अभ्यासही मन लावून केला, डॉक्टरही झाले पण काही काळात नव्हते रे. सतत काहीतरी मागे राहिल्यासारखे वाटत होते. असे वाटायचे तू पण यावेसे दिल्लीला.” एवढा वेळ इकडे तिकडे बघत ऐकणाऱ्या प्रतिकने चमकून तिच्याकडे पहिले. सायली एकटक त्याच्याकडे बघत होती. प्रतीकला तिच्या नजरेला नजर देणे कठीण जात होते. पण ह्यावेळी त्याने ठरविले होते, हिला काही कळत नाही आणि हिच्या बोलण्याचा उगाच काहीतरी आपल्याला सोयीस्कर अर्थ काढायचा नाही. हि काहीतरी भलतेच बोलते नंतर. आजही असेच काहीतरी करेल हि. 

तो म्हणाला, “मी कशाला येणार होतो दिल्लीला? ते तुझे स्वप्न होते माझे नाही. तुझे स्वप्न सांगितलेस तू, माझे कधी विचारलेस?” शेवटचा प्रश्न त्याने जरा घुश्श्यातच विचारला आणि त्यालाच जाणवले ते. “सोड ते. तू बोल पुढचा काय विचार?” असे म्हणून त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. “तूच सांग, तूच माझा हिरो.” आता मात्र प्रतीकच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. हिरो हिरो म्हणून मझे आयुष्य झिरो करून जाते दरवेळी. “कसला हिरो? तुझे आयुष्य तू तुला पाहिजे तसे जगतेस. तुला काय फरक पडतो. कोणाला विचारून निर्णय घेतेस? आधी ठरवतेस आणि मग सांगतेस.” एकटक सायलीकडे बघत त्याने बोलणे चालू ठेवले. आज त्याला मोल;ए व्हायचे होते. मीच का दरवेळी सहन करू आणि तेही हिला समजत नाही म्हणून, मग येते कशाला माझ्या आयुष्यात ही सगळे ढवळून काढायला? जणू तिला अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे केले होते तिला आणि जाब विचारात होता. “म्हणून तर ह्यावेळी काही न ठरवता आले आहे. तू सांग.” ती अगतिकपणे बोलत होती, ” तू तर दूर निघालास आता. आता कोणाला विचारणार मी?” 

प्रतीकला कळतच नव्हते काही. हिचे सगळं ठरले आहे आणि ही काय विचारते आहे आपल्याला आता? “तू पण ऍडमिशन घेतली आहेस ना? मग आता काय विचारायचे आहे तुला?” त्याने घुश्श्यातच विचारले. “तुला नाही ठाऊक? खरेच नाही” असे म्हणत तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि प्रतिकने झटका बसल्या सारखा हात पटकन मागे घेतला. सायलीने त्याच्याकडे बघितले. एक वेगळीच वेदना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. प्रतीकला तिला असे बघवत नव्हते. पण काय करावे कळत नव्हते. नक्की काय प्रॉब्लेम आहे हिचा? “काय म्हणायचे आहे तुला, मला खरेच कळत नाही आहे.” सायलीच्या डोळ्यात पाणी तरळले. प्रतीकच्या हृदयात एक कळ उठली. मी रडवले हिला? हेच बाकी होते. एवढी वर्षे जे मनात दडपून ठेवले ते आजच का बाहेर यायचे होते? आता त्यालाच अपराधी वाटू लागले. “काय झाले? सांगशील मला?” असे म्हणत त्याने हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. सायलीने तो तसाच राहू दिला. “मी दिल्लीला गेले ना तेव्हा सुरवातीला सगळे नवीन होते त्यात थोडावेळ गेला. नवीन कॉलेज, नवीन वातावरण, सगळे कसे भव्य. नवीन मित्र मैत्रिणी पण झाल्या पण नंतर नंतर काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते सतत. काहीतरी मागे राहिले असे वाटत होते पण कळत नव्हते. एक नवीन मित्र पण झाला. आनंद, खूप चांगला, खूप मदत केली त्याने. पण कुठेतरी त्यात मी का कोण जाणे तुला शोधत होते. गेल्या वर्षी त्याने विचारले सांगितले सुद्धा की मी त्याला खूप आवडत होते आणि विचारलेही माझा काय विचार आहे? प्रतीकच्या हृदयाचा ठोका चुकला होता. त्याला जरी आता अपेक्षा उरली नव्हती तरी निदान तिच्या तोंडून तिला दुसरा कोणी आवडतो हे ऐकण्याची हिम्मत नव्हती त्याच्यात.

त्याचे हात गार पडले होते. तिची नजर चुकवत हळूच त्याने तिच्या हातावरचा हात मागे घेण्याचा प्रयत्न केला, पण सायलीने दुसऱ्या हाताने तो तसाच पकडून ठेवला. “मग काय सांगितलेस तू?’ नकळत प्रतिकने विचारले. “काय सांगायला पाहिजे होते मी प्रतीक?” एवढी अगतिक हाक मारली तिने कि त्याला वाटले पटकन हिला जवळ घ्यावे आणि सांगावे काही बोलू नकोस अत्ता, निदान माझ्या समोर. त्याने काहीच न बोलता तिच्याकडे बघितले. “सांग ना. काय सांगायला पाहिजे होते?” आज तिचा नूर काही वेगळाच होता. प्रतीकला कळण्याच्या पलीकडे होते सर्वकाही. तो काहीच बोलत नव्हता. “तुला चालले असते मी हो म्हटले असते तर?” आता खरेच तो बधिर झाला होता. तिच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकत नव्हता. कशाच्या जोरावर तो सांगणार होता नाही म्हणायला हवे होतेस तू, कारण त्याने स्वतःचे प्रेम कधी व्यक्तच केले नव्हते. त्याला शांत बघून सायलीने विचारले, “प्रतीक, मी वेडी होते ना जरा, काहीच कळायचे नाही मला.” प्रतीक हसला नि मनात म्हणाला, अजून तरी कुठे कळते काही? एवढे बालिश कोण असते? “खूप घालमेल होत होती माझी तू जाणार हे कळल्यापासून. तू विसरलास तर मला तिकडे जाऊन? प्रतीक मला सहन नाही होणार. मी मूर्खासारखी वागले ना रे? म्हणूनच मला ही शिक्षा मिळते आहे. तू सोडून चाललास मला.” प्रतीकची तिच्या हातावरची पकड घट्ट झाली अचानक आणि तिने त्याच्या डोळ्यात एक वेदना बघितली. “तुझे प्रेम होते ना माझ्यावर?” आता कडेलोट झाला होता आणि सहन करण्याच्या पलीकडे होत होते प्रतीकला. “अजूनही आहे” पटकन तो बोलून गेला. सायलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटून गेले आणि ती पटकन म्हणाली, “माझेही आहे रे आणि तेव्हाही होते रे, पण मला बावळटला कळलेच नाही.” “बावळट तर आहेसच तू” प्रतीक बोलून गेला. “आता एवढ्या उशिरा सांगते आहेस. निघायची वेळ जवळ अली माझी आता. त्यावेळी मी उशीर केला आणि ह्यावेळी तू. मी आता चाललो सायली आणि माहित नाही परत कधी येईन? येईन कि नाही तेही माहित नाही.”

सायलीच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा उमटली. “खरेच उशीर झाला?” तिने विचारले. तिने तिची त्याच्या हातावरची पकड घट्ट केली. प्रतीकला कळत नव्हते काय बोलावे पण हेही ठाऊक नव्हते ह्या नात्याचे भविष्य काय? कोणास ठाऊक परत कधी भेटू? ह्या दरम्यान हिला कोणी आवडले तर? माझ्या आयुष्यात काय वाढले आहे माहित नाही. ही इकडे, मी तिकडे. 

“आपल्याकडे वेळ कुठे आहे सायली? मी तिकडे आणि तू इकडे? परत येण्याची माझ्या काही खात्री नाही. उगाच मला आशेवर नाही राहायचे आता.” “म्हणजे आशा आहे ना तर? म्हणजे प्रेम आहे ना रे कुठेतरी, थोडेतरी शिल्लक?” सायलीने अधीरपणे विचारले. “एकदा मी स्वतःला सावरले आहे सायली. आता हिम्मत नाही ग माझ्यात. खूप त्रास होतो, सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि सहन करावे लागते. ओंकारमुळे मी सावरलो. त्यालाच माहित आहे माझी अवस्था. तू गेलीस निघून काहीही विचार न करता, तुझी स्वप्ने पूर्ण करायला. मी स्वतःला कसे सावरले आहे मला माहित आहे.” म्हणत त्याने तिचा हात बाजूला करण्याचं असफल प्रयत्न केला. पण सायलीने पकड अजून घट्ट करत विचारले, ” जर नसता गेलास तर हो म्हणाला असतास? सांग ना. मी त्या एका आनंदात दिवस काढेन उरलेले.” “काय उपयोग अशा प्रश्नांचा सायली? का करते आहेस असे? माझे जाणे अजून मुश्किल नको करुस.” प्रतीक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होत पण समजेल तर ती सायली कुठली? “म्हणजे आहे ना प्रेम? प्रतीक सांग ना प्लिज, प्रतीक.” एवढी आर्त हाक ऐकून त्याला राहवले नाही. नाहीतरी एकदा त्रास सहन केलाच आहे अजून थोडा. ओंकार म्हणाला होताच सांगून तरी टाकायचे होते निदान. ह्यावेळी सांगूनच टाकू. “हो सायली. मला तू तेव्हाही आवडत होतीस आणि आजही खूप आवडतेस. आहे प्रेम माझे तुझ्यावर आणि राहील ते तसेच.” हे बोलल्यावर काय झाले कोणास ठाऊक पण त्याला खूप हलके वाटले. असे वाटले खूप मोठे ओझे उतरले मनावरून आणि आता त्याला सायलीचे नजर चुकवायचीही गरज नव्हती. सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. ती खुश होती हे ऐकून कि त्याचे अजूनही आपल्यावर प्रेम आहे. त्याचवेळी त्यांची कॉफी आली आणि सायलीने गुपचूप मागवलेला केक पण. चल सेलिब्रेट करूया. प्रतीकला हसू आले. कशी वेडी आहे ही, असा विचार करत तो कॉफी प्यायला. आज कॉफी खूप स्पेशल लागत होती. तो फक्त सायलीकडे एकटक बघत होता आणि सायली लाजून गुलाबी झाली होती. प्रतीकला जाणवत होते, हिला सोडून जाणे खूप कठीण होणार आहे पण तो आता काही करत शकू नव्हता, प्रेमाची कबुली तर देऊन बसला होता. प्रेम असतेच असे ना. “हे जे थोडे दिवस आहेत ते माझ्याबरोबर घालवायला आवडतील तुला? प्लिज!” परत एक आर्त आर्जव. तो नाही म्हणूच शकत नव्हता. त्यांनी तो छोटा केक कापला आणि सेलिब्रेट केले. कितीतरी वेळ ते तसेच हातावर हात ठेवून बसले होते जणू मागची कसर पूर्ण करत होते. थोड्या वेळाने प्रतीकने तिला जागे केले, “चला घरी, आई काय म्हणेल. उगीच भलते सलते काहीतरी विचार करत बसेल.” म्हणत बिल भरत तो उठला. त्याचा हात न सोडता सायली उठली आणि हसत हसत म्हणाली, ” भलते सलते? खरेच?” आणि दोघे हसू लागले. “अगं हात सोड, कोणी बघेल तर काय म्हणेल?” प्रतिकने उगीच विचारले. “तुला काय? तू तर चालला आहेस ना? मलाच म्हणतील काय म्हणायचे ते.” प्रतिकने हळवेपणे तिच्याकडे बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले. “सॉरी! आपण ना हे जे काही दिवस मला तुझ्याबरोबर मिळाले आहेत ते आनंदात घालवूया का? मी जाताना तुला रडवून गेले ना आता तू जाताना मला तुला हसत पाठवायचे आहे. प्लिज! आपण हा विषयच नाही काढायचा.” “तू मला ब्लॅकमेल करू नकोस हा सारखी, प्लिज म्हणून.” असे म्हणत प्रतिकने तिचा हात पडून ठेवला. दोघेही लवकर जाऊया म्हणत म्हणत लांबचा फेरफटका मारत घराकडे निघाले. घर जवळ आले तसे प्रतिकने हात सोडवायचा प्रयत्न केला पण खट्याळ सायली हात सोडेचना आणि प्रतीकला टेन्शन आले, “अगं, सोड हात आतातरी.” पण सायली ऐकेचना, “तू सोडवून घे पाहिजे तर. बघ सोडवायचा हे तुला?” तिने उलटच विचारले. कारण तिला माहित होते प्रतीकला ते जमणारच नाही. प्रतिकने फक्त तिच्याकडे बघितले आणि ह्यावेळी ऑफिशिअली तिच्या गालावर रुळणारी केसांची बट हक्काने मागे करत म्हणाला, “किती त्रास देते ही तुला. कितीदा वाटले होते मला हिला असे मागे करावे पण….” “आता सोड ना ते पण आणि बीण. आहे ना तुला हक्क आता? मग वापर.” प्रतीकला हसू आले. तेवढ्यात आईची हाक ऐकू अली, “कोण प्रतीक? आलास का रे?” आता मात्र सायलीनेच पटकन हात सोडला. “काय झाले मॅडम? घाबरलात?” “कोण घाबरले रे?” आईने विचारले. “काही नाही ग. ही सायली झुरळाला घाबरली.” प्रतिकने सारवासारव केली. “आणि काय रे उशीर झाला?” आईने विचारल्यावर सायलीला काही सुचेना, “अगं हिला जरा खरेदी करायची होती.” अशी प्रतिकने सारवासारव केली. “मग काय घेतले बघू” आईची अजून एक गुगली. आता प्रतीकची विकेट पडली. ” नाही काकू काय झाले, मला काही आवडलंच नाही.” हे ऐकत आई, “गॅस बंद करायला विसरले वाटते” म्हणत आत पळाली. आतूनच हाक मारत तिने प्रतीकला सांगितले, “प्रतीक, उशीर झालाय रे खूप, तिला घरी सोडून ये.” सोन्याहून पिवळे. दोघांनीही खुश होऊन एकमेकांकडे पाहिले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन प्रतीक निघाला.

“प्रतीक मला ना हे सगळे दिवस खूप छान घालवायचे आहेत आणि फक्त तुझ्या बरोबर” असे म्हणत सायलीने परत त्याचा हात हातात घेतला आणि प्रेमाने त्याच्याकडे बघितले. तेवढ्यात कोणीतरी प्रतीकला धक्का मारला. प्रतिकने समोर बघितले तर ओंकार. त्याच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह, प्रतीकच चेहरा घाबराघुबरा आणि सायलीची गडबडीने हात सोडवाण्याची धडपड असा एकाच गोंधळ उडाला. “ओंकार ऐक अरे, मी सांगतो तुला?” असे गडबडत प्रतीक बोलत होता तेवढ्यात, “साल्या, सॉरी सायली, पण रडायला माझा खांदा आणि हात धरणार हीच. मला कोण सांगणार आणि कधी? बोल साल्या किती दिवस चालू आहे? मला का नाही सांगितले? आज आपली मैत्री तुटली.” असे म्हणून तो निघाला पण. सायलीने गयावया करत त्याला अडवत सांगितले, “प्लिज रागवू नकोस ना. त्याची काही चूक नाही. मीच ती. माझ्यामुळे नेहमी गोंधळ होतो. तू प्लिज मैत्री तोडू नकोस,” असे म्हणत जवळ जवळ ती रडायला लागली. आता मात्र ओंकारलाच टेन्शन आले, “अगं मी मस्करी करत होतो बाई. माझा दोस्त आहे तो आणि त्याच्या आनंदात मला आनंद आहे. असा थोडाच मी सॊडणार त्याला? वेडी आहेस का तू? अजून वेडीच आहे ना ही?” शेवटचे वाक्य बोलत त्याने प्रतिककडे बघितले आणि प्रतिकने पण त्याला टाळी दिली. आता मात्र सायलीचा अविर्भाव बदलला. “मी वेडी? तू शहाणा? तुला माहित होते तर सांगितले का नाहीस आधीच मला? तुझ्यामुळे किती त्रास दिला मी त्याला? मित्र ना तू त्याचा?” असे म्हणत त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत त्याला प्रश्न विचारू लागली. त्यावर “हे काय यार?खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा बारा आना. मलाच प्रश्न? तुम्ही गोंधळ घाला, हा एक मुखशून्य आणि तू प्रचन्ड हुशार आणि मलाच दोष द्या. चोराच्या उलट्या बोंबा. तुम्हीच पार्टी द्या मला आता.” “चल दिली ” दोघेही एकसुरात म्हणाले. “अरे वाह, फारच सूर जुळायला लागले आहेत.” आता तिघेही हसायला लागले. “स्वारी निघाली कुठे आता?” त्यावर प्रतीक म्हणाला, “अरे हिला घरी सोडायला. आईने सांगितले आहे. आईची आज्ञा शिरसावंद्य.” “आईला पण माहित आहे? आणि मलाच उशिरा कळले?” परत ओरडत त्याने विचारले. आता मात्र त्याच्या तोंडावर हात ठेवत प्रतीक म्हणाला, “वेडा आहेस का तू? उशीर झाला आहे म्हणून आपले आई म्हणाली. आता तूच बोंबाबोंब करू नकोस. चल चुपचाप आमच्या बरोबर,” असे म्हणत जवळ जवळ त्याने ओंकारला ओढलेच.” “मी कशाला कबाब मध्ये हड्डी?” विचारात तो तिकडेच उभा राहिला. “चला आता नाटक नको, कळले.” म्हणत प्रतिकने परत त्याला खेचले आणि ते तिघेही चालू लागले. गप्पा मारत मारत त्यांनी सायलीला घर जवळ सोडले. तिची आई वाट बघतच होती. “काकू हिला सोडायला आलो उशीर झाला ना म्हणून,” ओंकार ने नांदी केली प्रश्नांची सरबत्ती होण्यापूर्वीच. “निघतो आता. आई वाट बघत असेल” असे म्हणून तो प्रतीकला घेऊन निघालाही. त्याला घाई होती सगळे जाणून घ्यायची. त्याला प्रतीक बरोबर बघून आईने विचारले, “हा कुठे भेटला?” “आम्ही सायलीला घरी सोडायला गेलो होतो.” त्याने सांगून टाकले. “जेवा आता,” म्हणत आईने दोघांना वाढले. “नाही काकू आज ना भूक नसणार ह्याला, हो ना रे?” म्हणत त्याने हसत प्रतिकीकडे बघितले आणि डोळा मारला. प्र्तिकने रागाने त्याच्याकडे बघितले. “काय रे खाऊन आलात का?” ह्या आईच्या प्रश्नावर घाईने प्रतिकनेच, “हो थोडे खाल्ले आहे आई पण, भूक आहे. तू वाढ” असे उत्तर दिले आणि तो ओंकार ला हात धुवायला घेऊन गेला. “मार खाशील आता तू आगाऊपणा केलास तर.” म्हणत त्याला एक फटका लगावतच बाहेर घेऊन आला प्रतीक त्याला. “अरे का मारतोयस त्याला?” नेमके आईने बघितले आणि विचारले,”काही नाही आई, तो हात धूत नव्हता” अशी सारवासारव करत त्याने ओंकारला जेवायला बसविले. “आज जेवण खूप गोड लागत असेल ना?” ऐकेल तर तो ओंकार कसला. प्रतिकने त्याला टॅबलाखालून लाथ मारली. “कारे बाबा?” आईने विचारलेच? “काही नाही ग आई आता तुझ्या हातचे खायला नाही मिळणार ना म्हणून म्हणतोय तो. तू नको लक्ष देऊस.” ऐकून आईला वाईट वाटले, आता हा दूर जाणार, काय खाणार, कोण ह्याची काळजी करणार कोणास ठाऊक ह्या विचारांनी तिचे डोळे पाणावले आणि मग ओंकार पण शांत झाला. “काकू आपण जाऊ ना तिकडे, मी घेऊन जाईन तुम्हाला पण तुम्ही फ्रॉक वगैरे घेऊन ठेवा हा..” असे म्हणत त्याने वातावरण थोडे हलके केलं आणि आईला हसू आले. 

आता रोज सायली आणि प्रतीकच्या गाठीभेटी होऊ लागल्या. एकीकडे मनातील हुरहूर वाढत होती. अवघे आठ दिवस उरले होते हातात. कधीकधी प्रतीकला वाटे ही काही बोललीच नसती तर बरे झाले असते. आता हिला सोडून जायचे अजून कठीण झाले आहे. इतकी बालिश आहे, कोण सांभाळणार हिला इकडे. सगळ्यांवर विश्वास ठेवते आणि गोड बोलते. आनंद प्रेमात न पडता तरच नवल होते. काय करू आता? कशाला बोलली ही? तो आपल्याच विचारात होता आणि पाठून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सायली आली होती. स्वतः बनवलेल्या कुकीज घेऊन. “ह्या बघ मी बनवल्या तुझ्यासाठी, खाऊन बघ ना.” प्रतीकच्या चेहऱ्यावर दुःखाची लकेर उमटली. कसा राहू मी हिच्याशिवाय? अशी कशी ही? मला इतके वाईट वाटते आहे आणि ही एवढी खूष. हिला काहीच वाटत नाही मी आता जाणार त्याचे? असे विचार मनात येतच होते तेवढ्यात “काय झाले? एवढया वाईट नाही झाल्या आहेत.” असे म्हणून खुद्कन हसली. “तुला वाईट नाही वाटत आपण आता फार थोडे दिवस भेटणार ह्याचे? का बोललीस तू सगळे? माझे जाणे आता दुश्वार झाले आहे. दररोज असे वाटते काळीज चिरते आहे.” प्रतीक हे बोलला आणि तिच्या चेहऱ्यावरचे हास्य विरळ झाले. तिच्या डोळ्यात तरळलेले पाणी पाहून प्रतीकला वाटले, एक थोबाडीत मारून घ्यावी स्वतःच्या. कशाला बोललो मी उगाच? एवढी आनंदात आली ही माझ्यासाठी आणि मी काय केले तर हिला रडवले. त्याने पटकन तिच्या हातावर हात ठेवत सॉरी म्हटले. त्यावर कसनुसे हसत सायली म्हणाली, “मला ना हे आठ दिवस तुझ्यासोबत खूप खूष राहायचे आहे. तुला खूप चांगल्या आठवणी द्यायच्या आहेत. तुझ्या पाच वर्षांची भरपाई करायची आहे जी मी तुला त्रास देण्यात घालविली.” प्रतिकने तिला अडवत म्हटले, “सोड ना तो विषय. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण हे दिवस छान हसत खेळत घालवू. जाण्याची गोष्ट बोलायचीच नाही आता.” असे म्हणत त्याने, हळूच तिच्या गालावर रुळणारी बट मागे केली. सायली हल्ली मुद्दामच केस सोडून यायची. त्याचे असे हलकेच दोन बोटानी बट मागे करणे तिला खूप आवडायचे. तिने मग डबा उघडला आणि त्याला कुकीज दिल्या. दोघांनी खूप गप्पा मारल्या आणि मग प्रतीकला जी काही थोडीफार खरेदी करायची होती ती केली. रात्री एकमेकांना सोडून जाताना दोघांचा जीव तुटत असे. दोन मिनिटे घट्ट हात पकडून दोघेही उभे रहात आणि मग जीवावर येऊन आपआपल्या घराकडे जात, प्रतीक तिला घरापर्यंत सोडून मग घरी येत असे. असे करत सहा दिवस संपले आणि शेवटचा दिवस उजाडला. 

आज प्रतीकला खूप अस्वस्थ वाटत होते. तो सकाळीच मित्रांना भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडला. दुकानात जाऊन त्याने एक सुंदर परफ्युम, एक घड्याळ असे गिफ्ट्स घेतले आणि दुपारी दोघेही जेवायला, लांब फेरफटका मारत एकका धाब्यावर गेले. तिकडे गप्पा मारत मारत अचानक दोघेही शांत झाले. प्रतीक फक्त तिला न्याहाळत होता आणि तिचे डोळे ओघळायचे बाकी होते. त्याला पुढचा घास खाववेना. त्याने तीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. किती वेळ कोण जाणे, पण दोघेही शांत बसले होते. मग प्रतिकने तिला तिच्यासाठी आणलेली गिफ्ट्स दिली. “ही कशासाठी? मला काही नको अरे.” असे ती म्हणत असतानाच, हळूच नेहमीप्रमाणे तिची बट मागे सारत त्याने सांगितले, “हा सुंगंध आपल्या प्रेमाचा आणि हे घड्याळ तुला ह्या क्षणांची आठवण करून देईल जे आपण एकत्र घालविले. तुला माहित आहे, माझ्या अंगणात एल सायलीचे वेल आहे. तिच्या सुगंधाने मला हि पाच वर्षे साथ दिली होती.” त्याने हळूच तिला जवळ घेतले आणि तीही त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन बसून राहिली त्याचा हात हातात घेऊन. थोड्या वेळाने दोघेंहो उठले परत निघण्यासाठी आणि अचानक प्रतिकने विचारले, “उद्या मला सोडायला येशील ना एरपोर्टवर? जाईपर्यंत बघायचे आहे मला तुला. साठवून घ्यायचे आहे मनात आणि हृदयात.” सायलीने मानेनेच नकार दिला. “मी तुला सोडणारच नाही आहे तर सोडायला का येऊ?” असे म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली. आता प्रतीकांच्या डोळ्यात पण पाणी दाटून आले आणि त्याचे काही अश्रू सायलीच्या डोक्यावर ओघळले. तिला जाणवले ते पण तिने मिठी सोडली नाही. थोड्या वेळाने तिला दूर करत प्रतीक म्हणाला, “हे ही बरोबर आहे. उगीच माझी पावले नकोत अजून जड व्हायला. आजचा हा दिवस कायम स्मरणात राहील, आपली परत भेट होई पर्यंत. असे म्हणून त्याने तिला शेवटचे गिफ्ट, कॅडबरी दिले आणि दोघांनी हसत हसत ते खाल्ले. आता दोघेही परत निघाले, सायली, त्याच्या खांद्यावर डोके ठवून निवांत बसली होती त्याच्या कमरेला विळखा घालून आणि प्रतीकला वाटत होते हा क्षण इथेच थांबवा. पण शेवटी घर जवळ आले आणि सायली उतरली. प्रतिकने हलकेच परत तिची बट मागे सारली आणि तिला नायाहाळून म्हणाला, “दुसऱ्या कोणाला नको हा हि मागे सारायला देऊस मी नसताना.” “ए काय रे तू?” असे लटकेच रागाने बोलत सायलीने हळूच त्याचा हात दाबला आणि त्याला निरोप देऊन ती निघाली. प्रतीक घरी परतला आणि आई बाबा दोघांबरोबर गप्पा मारत त्याने रात्रीचे जेवण केले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी तो तयार झाला, देवाच्या, आई बाबांच्या पाया पडून. आईने हातावर दिलेले दही त्याने खाल्ले. आईचे डोळे भरून आले होते. बाबा दाखवत नव्हते पण त्यांनाही वाईट वाटत होते. प्रतिकने आईला जवळ घेतले, “तू नको काळजी करुस माझी. मी सांभाळेन स्वतःला. तुम्ही दोघे काळजी घ्या आणि नीट जेवा. बाबा तुमचा सकाळचा फेरफटका चालू ठेवा आणि आईलासुद्धा बरोबर घेऊन जात जा. इतकी वर्षे माझ्यामुळे जमले नाही तिला.” बाबानी होकार देत, “चला आता नाही तर उशीर होईल,” असे सांगत प्रसंग हळवा होण्यापासून सांभाळला. सगळे निघाले आणि एरपोर्टवर त्याचे मित्र पण आले होते. प्रतीकला सायलीची आठवण आली, वाटले, एकदा बघितले असते हिला डोळेभरून. पण तेवढ्यात ओंकारने त्याला हाक मारली, “काय रे तिकीट, पासपोर्ट आहे ना वरच? नीट जा आणि खिडकीतून हात बाहेर काढू नकोस.” ह्यावर सगळे जण खळखळून हसले. परत एकदा नमस्कार करून आणि आईला जवळ घेऊन प्रतीक बॅग घेऊन आत निघाला. आत गेल्यावर परत त्याने वळून सगळ्यांना टाटा केला. सायली भेटली असती तर? परत एकदा त्याच्या मनात येऊन गेले. 

तो बोर्डिंग साठी जाऊन बसला. इकडेतिकडे लोकं होते पण त्याचे लक्ष नव्हते. सायलीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. असे वाटत होते उडून जावे आणि तिला भेटून यावे तिला क्षणभर बाहुपाशात भरावे म्हणजे हृदयात साठवता येईल. पण ते शक्य नव्हते म्हणून त्याने शेवटी एक पुस्तक काढले बॅगमधून आणि तो मन रमवू लागला. कोणीतरी त्याची बाजूला ठेवलेली बॅग दूर सारत विचारले, “एक्स्क्यूज मी, मी इथे बसू शकते का?” जरा वैतागूनच त्याने पुस्तकातून डोके काढले, “एवढी जागा पडली आहे आणि हिला इकडेच का बसायचे आहे?” अस विचार करत वर बघितले आणि तो आ करून बघतच बसला. त्याला काही कळत नव्हते. सायलीची डुप्लिकेट? असे कसे असेल? मग सायली? ती कशी येईल? तो विचारात गर्क असताना, सायलीने त्याला गदागदा हलवून विचारले, “अरे काय म्हणते आहे मी? मी बसू का इकडे?” प्रतिकने टुणकन उडी मारली आणि तिला चक्क घट्ट मिठी मारली. सायली लाजली आणि म्हणाली, “अरे काय करतोस? बघताहेत सागळे.” “बघू देत, मला फरक नाही पडत,” असे म्हणून त्याने तिला मिठीतून सोडलेच नाही. तिनेही हरकत घेतली नाही. दोन मिनिटांनी तिला मिठीतून मोकळे करत त्याने विचारले, “तू कशी इकडे? तू तर म्हणाली होतीस तू येणार नाहीस मला सोडायला, मग आता कशी आलीस? आणि मुख्य म्हणजे तूला आत कसे सोडले?” “अरे! किती प्रश्न? कशी आले म्हणजे काय तिकीट काढले आहे मी.” त्यावर जोरात हसत प्रतीक म्हणाला, “हो का? किती १०० रुपयांना मिळाले का?” सायलीने एक फटका मारत सांगितले, “हजारो मोजले आहेत बरे का?” “म्हणजे काय?” प्रतीकला संदर्भ लागत नव्हता. “तुला अर्धवटच लक्षात राहते का रे मी काय बोलले ते? तुला मी काय सांगितले होते, तुला मी सोडणारच नाही आहे तर सोडायला का येऊ?” अजूनही प्रतीकच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, “म्हणजे?”. “म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. मी तुझ्या बरोबर येते आहे. माझी पण ऍडमिशन झाली आहे तिकडे. तुझ्या कॉलेजला नाही पण थोडी दूर खरेतर बऱ्यापैकी दूर. खरेतर माझे तिकीट २ दिवसानंतरचे होते पण मी अड्जस्ट करून घेतले आणि त्यासाठी अजून पैसे मोजले बरे का?” आता कुठे प्रतीकच्या डोक्यात उजेड पडला. त्याचा विश्वासच बसत नव्हता स्वतःच्या कानावर. “अच्छा म्हणून मॅडम सतत खूष होत्या आणि आम्ही आपले आसवे गाळत होतो. तरीच म्हटले हिला कसे काहीच वाटतं नाही. पण मग त्यादिवशी का डोळे पाणावले ग तुझे?” परत हळवी झाली सायली, “तुझ्या डोळ्यात पाणी बघून. नाही बघू शकत मी. स्वतःची चीड येते मला, तुला एवढी वर्षे सतावले ना?” प्रतिकने लगेच “सोड ना आता. नको बोलूस ते. झाले गेले गंगेला मिळाले. तू माझ्या बरोबर आहेस ह्यापेक्षा मला अजून काय हवे?” असे म्हणत तिला खुश केले. पण आपल्या सीट्स? आधी सांगितले असतेस तर बाजूबाजूला घेतल्या असत्या ना?” “बाजुबाजुलाच आहेत.बर का.” प्रतीकच्या चेहऱ्यावर परत प्रश्नचिन्ह. “आता सांग कोण वेडं आहे? हसलात ना मला खूप तू आणि तुझा मित्र त्यादिवशी. त्यालाच सामील केले ह्या खेळात मी त्याच्या नकळत. चौकशा केल्या तुझ्या आणि मिळविली माहिती. त्यानेच दिला तुझा सीट नंबर. मग हे सगळे उपदव्याप केले. ” “सॉलिड आहेस तू. आम्ही क्षमा मागतो राणी सरकार.” असे म्हणून प्रतिकने तिच्या समोर हात जोडले आणि दोघेही खळाळून हसले. “मग फुकटची उशी कोण सोडणार झोपायला?” प्रतिकने तिच्याकडे पुन्हा प्रश्नार्थक नजरेने बघितले आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले, “ही काय माझी हक्काची उशी.” 

प्रतिकने मनोमन देवाचे आभार मानले आणि हात जोडले.

आज सायलीचा सुगंध त्याच्या आयुष्यात दरवळला होता आणि कायमचा …….

More blogs

The pot that lost its shape

Once there lived a potter who made beautiful and unique pottery in his workshop. His pottery had a classic touch and he worked on each detailing for the class apart finesse. The patrons always appreciated and waited for his work. His unique ideas, methods and ways of...

read more

Samudra Manthan… Guide to success

Samudra Manthan, we all have read or heard about the story and wondered about the jewels, that emerged from it along with other amazing things. It is the time when Suras (Gods) and Asuras (An) worked in collaboration since both aspired for the Amrut, the nectar of...

read more

Choose to choose

Once upon a time a girl lived in a beautiful heaven. It was peaceful, serene and she was free to live her life as per her wish. one day some monsters attacked the place and to save herself, she hid in a dark cave that provided her with a shelter. Being dark and not...

read more
Share This